निवास वरपे- म्हालसवडे--कोलकाता येथे झालेल्या ६१व्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत कांचनवाडी (ता. करवीर) येथील आरती व ज्योती बाजीराव पाटील या जुळ्या बहिणींनी एक सुवर्ण व पाच रौप्यपदके मिळवून कांचनवाडीचे नाव जागतिक पातळीवर पोहोचविले. यातील आरतीची तुर्कस्थान येथे होणाऱ्या शालेय आंतरराष्ट्रीय एशियन ब्रेस्ट स्ट्रोक जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.जलतरणपटू बाजीराव पाटील हे पोलीस खात्यात कार्यरत आहेत. ग्रीस (युरोप) येथील सागरी आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. दोन वर्षे वयाच्या आरती आणि ज्योती या जुळ्या मुलींना पोहण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. अल्पावधीतच म्हणजे ३ वर्षे ११ महिने वयाच्या या बहिणींनी मुंबई येथील संकरॉक ते गेटवे आॅफ इंडिया हे पाच किलोमीटर सागरी आंतर अवघ्या एक तास ३० मिनिटांत पोहून पार केले होते. तेव्हापासून त्यांना सागरीकन्या म्हणून संबोधण्यात येत आहे. कमी वयात जुळ्या बहिणींनी पोहण्याचा हा जागतिक विक्रम केला होता. माटुंगा (मुंबई) येथील राम निवास रूईचा या कॉलेजमध्ये अकरावी आर्टस्मध्ये त्या शिकत आहेत. आई मीना व वडील बाजीराव यांच्या मार्गदर्शनाखाली स्विमिंगमधील बेस्ट ट्रोक, फ्री स्टाईल, बटरफ्लाय, साइडस्ट्रोक, बॅकस्ट्रोक असे विविध प्रकारचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे. पहाटे साडेपाच ते साडेसात व सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत वरळी पोलीस क्लबमध्ये त्या नियमित सराव करतात. मागील वर्षी आरतीला जलतरणमधील राष्ट्रीय रौप्यपदक मिळाले होते. शासकीय नियमानुसार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड होऊनही लंडन येथे तिला स्वखर्चाने जावे लागणार होते. आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती भाग घेऊ शकली नव्हती. सध्या राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त केल्याने ती शासकीय खर्चाने ‘टर्की’ या देशात जाऊन देशाचे नाव उज्ज्वल करणार असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्योतीला कोलकाता येथील जलतरणमध्ये सध्या चार रौप्यपदके मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाण्याची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, त्या स्पर्धेला जाण्याचा अंदाजे तीन लाख रुपये अपेक्षित खर्च असून, दिला शासकीय अथवा लोकप्रतिनिधी किंवा दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक साहाय्य मिळणे गरजेचे आहे तरच ज्योतीदेखील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकते.ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये आरतीने २ मिनिट ४८ सेंकदांत सुवर्ण व ज्योतीने २ मिनिट ५० सेकंदांत रौप्यपदक मिळविले. पोहण्याच्या स्पर्धेत यश मिळविणे दोघीनाही अवघड वाटत नाही; मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवून आॅलिम्पिकमध्ये माझ्या मुलींना सहभाग घेता यावा हीच अपेक्षा आहे.- बाजीराव पाटील, (वडील व प्रशिक्षक) आजपर्यंतची पदकेपदके आरती ज्योतीराज्यस्तरीय ३० २१राष्ट्रीय ११ ४इतर ८९ ९०एकूण १३० ११५
आरती, ज्योतीची भरारी
By admin | Published: December 01, 2015 12:29 AM