लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सर्वाधिक ठराव व दूध असणाऱ्या करवीर तालुक्याचे ‘गोकुळ’च्या राजकारणात नेहमीच वर्चस्व राहिले आहे. स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांनी सर्वाधिक काळ संचालक म्हणून काम केल्याने दूध संस्थांवर त्यांची पकड आहे. या दोन्ही नेत्यांच्या भूमिकांना संघाच्या राजकारणात महत्त्व राहिले आहे. मात्र विश्वास पाटील यांच्य गटांतर्गत हालचाली पाहता, त्यांची भूमिका सत्तारूढ गटासमोरील अडचणी वाढवू शकते.
करवीरमध्ये ६४१ मतदान असल्याने तालुक्यातील बेरीज-वजाबाकीच्या राजकारणावर पॅनलचा बॅलन्स राहतो. मागील निवडणुकीत सत्तारूढ गटाकडून विश्वास पाटील, उदय पाटील, सुरेश पाटील, बाळासाहेब खाडे व जयश्री आनंदराव पाटील-चुयेकर, तर विरोधी पॅनलमधून चंद्रकांत बोंद्रे विजयी झाले होते. गेल्या पाच वर्षांत सत्तारूढ गटातील समीकरणे बदलली आहे. या निवडणुकीत विश्वास पाटील व शशिकांत पाटील-चुयेकर यांनी स्वतंत्रपणे ठराव दाखल केले. तेव्हापासून त्यांची पुढील दिशा स्पष्ट झाली. मात्र अद्याप त्यांनी कोणतीच भूमिका घेतलेली नाही. विश्वास पाटील यांनी प्रचार यंत्रणाही स्वतंत्र राबविली असून, त्यांच्या गटांतर्गत हालचाली सत्तारूढ गटासमोरील अडचणी वाढवणाऱ्या आहेत.
संचालक मंडळाची संख्या १८ वरून २१ झाल्याने करवीरला पाचऐवजी सहा जागा देण्याचा सत्तारूढ गटाचा प्रयत्न असू शकतो. एकूण ६४१ पैकी तब्बल ५०६ ठराव हे करवीर व १३५ ठराव हे दक्षिण मतदारसंघातील आहेत. त्यामुळे सहापैकी पाच जागा ‘करवीर’मध्ये राहू शकतात. येथे विद्यमान चार संचालक आहेत, उर्वरित एक जागा जुन्या करवीरमध्ये जाऊ शकते. सत्तारूढ गटाकडून विश्वास पाटील, उदय पाटील, सत्यजित पाटील, बाळासाहेब खाडे यांच्यासह राजेश पाटील, राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नावांची चर्चा आहे. जुन्या करवीरमधून हंबीरराव वळके (निगवे दुमाला) व तुकाराम पाटील (खुपीरे) हे प्रयत्नशील आहेत. ‘दक्षिण’मध्ये शशिकांत पाटील-चुयेकर व तानाजी पाटील (गडमुडशिंगी) यांच्या नावाची चर्चा आहे.
विरोधी पॅनेलमध्ये कॉंग्रेस (सतेज पाटील गट), राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप, आदींचा समावेश असल्याने इच्छुकांची मांदियाळी आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, शेकापला एक-एक जागा मिळू शकतात. विश्वास पाटील हे इकडे आले तर त्यांना एक जागा दिल्यानंतर दोन जागा सतेज पाटील यांना राहतील. ते एक जुन्या करवीरमध्ये, तर दुसरी ‘दक्षिण’मध्ये देऊ शकतात. पाटील यांच्याकडून बाबासाहेब चौगुले, रमा बोंद्रे, इंद्रजित बोंद्रे, किरणसिंह पाटील, शशिकांत खोत, प्रदीप पाटील-भुयेकर हे इच्छुक आहेत.
सांगरूळ, सडोली, परिते परिसरांत ३४७ ठराव
सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघात तब्बल १४१ ठराव आहेत. त्यापाठोपाठ सडोली खालसा मतदारसंघात १२७, तर परिते मतदारसंघात ७९ असे ३४० ठराव तीन मतदारसंघात असल्याने येथे दोन्ही पॅनलकडून किमान चार उमेदवारी देऊ शकतात. ‘शिंगणापूर’मध्ये ६७, ‘निगवे खालसा’ ६४, ‘शिये’ ३५, ‘वडणगे’ ४३, ‘गडमुडशिंगी’ २२, ‘पाचगाव’ १४, ‘उजळाईवाडी’ २१,‘उचगाव’ ५ व कसबा बावडा, न्यू पॅलेस, जाधववाडी, कदमवाडी व फुलेवाडी परिसरात उर्वरित संस्था.
दुसऱ्या जागेसाठी नरकेंची कसरत
चंद्रदीप नरके यांच्याकडून पन्हाळ्यातून अजित नरके यांची उमेदवारी निश्चित आहे. दुसरी जागा ‘करवीर’मध्ये मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आठजण इच्छुक असले तरी ‘कुंभी’ कार्यक्षेत्र वगळून उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहू शकतो. यातून अजित पाटील (परिते), बाजीराव पाटील (वडणगे), एस. आर. पाटील (चिखली) यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
‘राष्ट्रवादी’कडून माधुरी जांभळे यांच्यासाठी आग्रह
करवीरमध्ये पक्ष मजबूत करायचा झाल्यास येथे एक जागा देण्यावर मंत्री हसन मुश्रीफ आग्रही आहेत. त्यासाठी माधुरी मधुकर जांभळे यांचे नाव पुढे येत असून, तालुक्याला आतापर्यंत वंचित ठेवले असून या माध्यमातून न्याय द्यावा, अशी येथील कार्यकर्त्यांची मागणी आहे.
करवीरचे दूधसंकलन - २ लाख १६ हजार लिटर
संस्था सभासद- ६४१
विद्यमान संचालक - ६