लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचे गांभीर्य माहीत असूनही काहींकडून हलगर्जीपण होताना दिसून येत आहे. नवीन कोरोनाची टांगती तलवार असतानाही शहरात मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. गेल्या ११ महिन्यांत तब्बल ७६ हजार नागरिकांकडून मास्क घातला नसल्यावरून ७६ लाखांचा दंड वसूल केल्याची नोंद महापालिकेकडे आहे. अशाप्रकारे शासनाचे नियम भंग करणाऱ्यांकडून तब्बल ९३ लाख ५४ हजार इतका दंड वसूल केला आहे.
कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी प्रशासनाकडून नियम भंग करणाऱ्यांवर २३ मार्च २०२० पासून दंडात्मक कारवाई सुरू केली. महापालिका, केएमटी आणि पोलीस प्रशासनाची पथके नियुक्त केली. गेल्या ११ महिन्यांपासून ही कारवाई सुरू आहे. काहींना दोन वेळा दंड केला आहे, तर शहरात पर्यटनासाठी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांचाही यामध्ये समावेश आहे.
चौकट
दंड
सोशल डिस्टन्सिंग भंग : ५००
मास्क नसणे : १००
रस्त्यावर थुंकणे : २००
हॅन्डग्लोज नसणे : १००
चौक़ट
व्यक्ती वसूल दंड
सोशल डिस्टन्सिंचा भंग २००० १० लाख
मास्क नसणे ७६००० ७६ लाख
रस्त्यावर थुंकणे १००० २ लाख
हॅन्डग्लोज न घालणे ५५४० ५ लाख ५४ हजार
एकूण ९३ लाख ५४ हजार
चौकट
सावधान, पुन्हा रुग्ण वाढत आहेत
गेल्या आठ दिवसांपासून नवीन रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी राेज १० च्या आत नवीन रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा २० च्या वर गेला आहे. सोबत नवीन कोरोनानेही राज्यात शिरकाव केला आहे. कोल्हापुरातील एका मंत्र्याने हा नवीन आजार येण्यापूर्वी आणि आल्यानंतर २० हजार लोक परदेशातून राज्यात आल्याचा दाखला देत, सर्वांना किमान १५ दिवस सतर्क राहण्याचे आवाहनही एका कार्यक्रमात केले आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाचा १०० टक्के धोका टळलेला नाही. केवळ नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे महापालिकेकडून नियम भंग करणाऱ्यांवर कारवाईची माेहीम सुरूच ठेवली आहे. केएमटीचे दोन आणि महापालिकेचे तीन अशी पाच पथके तैनात आहेत. पथकांतील ३४ कर्मचारी नियम भंग करणाऱ्यावर वॉच ठेवून आहेत.
- सचिन जाधव, इस्टेट अधिकारी, महापालिका