कोल्हापूर : मोतीबाग तालमीचा मल्ल प्रेमराज कुंभारने चौथ्या मिनिटांलाच घुटना डावावर शिरोळच्या अभिनंदन चव्हाण याला अस्मान दाखवून कुस्तींच्या इतिहासातील प्रथमच झालेल्या १४ वर्षांखालील पैलवानांच्या भव्य कुस्ती मैदानाचे अजिंक्यपद पटकावले.
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघातर्फे खासबाग मैदानात पैलवान बाबा राजेमहाडिक यांच्या मदतीने शनिवारी या कुस्त्या पार पडल्या. या मैदानात राजर्षी शाहू महाराजांच्या ४५ पैलवानांच्या वंशजांनी प्रथमच उपस्थिती लावली. यावेळी मैदानात दुपारपासून मुलांच्या १९३ आणि मुलींच्या २२ चटकदार कुस्त्या झाल्या. विशेष म्हणजे नेपाळचा देवा थापा आणि पंजाबचा अमित लख्खा यांच्यातील चटकदार कुस्ती लक्षवेधी ठरली.
प्रथम क्रमांकाची प्रेमराज कुंभार विरुद्ध शिरोळचा अभिनंदन चव्हाण यांच्यातील लढत ७ वाजून ५७ मिनिटांनी सुरू झाली. आक्रमक अभिनंदनने पहिल्याच प्रयत्नात बाहेरची टांग लावून प्रेमराजवर कब्जा घेतला; मात्र, चपळ प्रेमराजने त्यातून सहीसलामत सुटत अभिनंदनवर ताबा मिळवत त्याच्या पोटाभोवती आपल्या हातांची पकड मजबूत केली. चौथ्या मिनिटाला त्याने घुटना डावावर अभिनंदनला अस्मान दाखवले. मुख्य पंच संभाजी पाटील यांनी तो विजयी झाल्याचे घोषित केले.
द्वितीय क्रमांकाच्या लढतीत पैलवान नंदगावच्या संस्कार चौगले याने कुर्डूच्या अथर्व पाटीलवर पोकळ डावावर विजय मिळविला. तिसऱ्या लढतीत कोपार्डेच्या गौरव पाटीलने कसबा बावड्याचा मल्ल समर्थ पायमलला ढाक डावावर अस्मान दाखवले. चौथ्या लढतीत बहिरेश्वरच्या आर्यन सावंतने कुरुंदवाडच्या विश्वजित पाटीलवर घिस्सा डावावर विजय मिळविला. पाचव्या लढतीत क्रीडा संकुलाच्या शैलेस सासने याने लाटणे डावावर पनवेलच्या सार्थक गोंधळीला चीतपट केले. सहाव्या लढतीत क्रीडा संकुलाच्याच पार्थ गौंड याने शाहूवाडीच्या सुशील डफळेला झोळी डावावर अस्मान दाखवले.
सातव्या लढतीत आटपाडीच्या रणवीर देशमुखने गडमुडशिंगीच्या राणा देशमुखवर घिस्सा डावावर विजय मिळविला. आठव्या लढतीत वाकरेच्या समर्थ पाटीलने इचलकरंजीच्या सोहम धुमाळवर एकरी पट काढत मात केली. नवव्या लढतीत वाकरेच्या केदार पाटीलने कुंभी कासारीच्या चैतन्य पाटीलवर झोळी डावावर आणि दहाव्या लढतीत कोपार्डेच्या सर्वेश कांबळेने क्रीडा संकुलाच्या संस्कार पाटीलला घिस्सा डावावर अस्मान दाखवले. या मैदानात अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या हस्ते पैलवान बाबाराजे महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. मैदानासाठी उमेश शिंदे, डॉ. रमेश जाधव, गणेश मानुगडे, गुंडा पाटील, संभाजी वरुटे, मिलिंद यादव आदी उपस्थित होते.