कोल्हापूर : ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली, तोच संदर्भ घेत येथील शौर्यपीठातर्फे बारा बलुतेदारांसह शनिवारी छत्रपती शिवाजी चौकामध्ये अभिनव आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी प्रसाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी मार्गदर्शन केले.यावेळी बीड जिल्ह्यातील विवेक रहाडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रसाद जाधव म्हणाले, काळाच्या प्रवाहात मराठा समाजाला शिक्षण घेण्यासाठी, आरोग्य उपचारासाठीही आर्थिक चणचण भासू लागली. २०१८ मध्ये तत्कालीन सरकारने आरक्षण दिले. मात्र त्याला आता स्थगिती मिळाली आहे. मात्र या लढ्याला बारा बलुतेदारांचाही पाठिंबा असल्याने या सर्वांना एकत्र घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला आहे.खासदार संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष, गट, तट, संघटना यांनी मतभेद विसरून आता कोणत्याही परिस्थितीत हे आरक्षण मिळवण्यासाठी एकोपा ठेवून कार्यरत राहण्याची गरज आहे. संपूर्ण अभ्यास करून आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
यावेळी प्रकाश सरनाईक, राजू जाधव, संजय वाईकर, दादासाहेब देसाई, राहूल इंगवले, फत्तेसिंह सावंत, सुजित चव्हाण, रविकिरण इंगवले, महेश जाधव, बैतुलमाल कमिटीचे जफर बाबा, अख्तर इनामदार, अदाम बागवान, जाफर मलबारी, वासीम चाबूकस्वार उपस्थित होते.