कोल्हापूर : त्याचे नाव काही असले तरी सारा दवाखाना व इतर पेशंटही त्याला अभ्या म्हणूनच ओळखायचे... तो डायलेसिसला आला की रुग्णालयही ताजे टवटवीत व्हायचे. प्रचंड हसतमुख. जगलो वाचलो तर गावची निवडणूक लढवीन इथपर्यंतची जिद्द... परंतु त्याचा हा प्रवास नियतीने सोमवारी थांबवला.अभिषेक दत्तात्रय लोंढे (वय १८, रा. उचगाव) असे या तरुणाचे नाव. त्याच्यावर येथील डायमंड मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात गेली अडीच वर्षे किडनी रोगतज्ज्ञ डॉ. विलास नाईक यांनी मोफत उपचार केले. काही करून अभ्या जगला पाहिजे अशीच डॉ. नाईक यांचीही तळमळ होती.अभ्याचे लहानपणीच किडनीच्या आजारपणाचे निदान झालेले. आईचे छत्र लहानपणीच नाहीसे झालेले. वडील गवंडी काम करतात, परंतु व्यसनी, बहिणीचे लग्न झाले आहे. बिचारी आजी भाजी विकून नातवासाठी धडपड करायची. सुरुवातीला जेव्हा उपचारासाठी आला तेव्हा त्याच्यातील जिगर पाहून डॉ. नाईक यांनी त्याच्यावर हवे ते उपचार करायचे असे ठरवले. आठवड्यातून तीन वेळेला डायलिसिसची गरज पडायची. हॉस्पिटल प्रशासनाने त्याचे उपचार पूर्णपणे मोफत करण्याची जबाबदारी उचलली. गेली अडीच वर्षे त्याला मोफत डायलिसिस दिले जात होते.मृत्यूच्या छायेखाली असूनही सतत हसतमुख आणि महत्त्वाकांक्षी असा त्याचा स्वभाव. जगलो तर गावची इलेक्शन लढवीन इथपर्यंतची जिद्द. आदमापूरच्या बाळूमामाचा तर तो परमभक्त. अमावस्येला खिशात पैसे नसतील तर स्टाफकडून आणि इतर लोकांकडून पैसे गोळा करून तो आदमापूरला जाणार म्हणजे जाणार. बोलक्या स्वभावामुळे त्याने प्रचंड मित्रपरिवार गोळा केला होता. कित्येक वेळेला वडाप रिक्षावाले त्याला हॉस्पिटलपर्यंत मोफतच आणून सोडायचे.डायलिसिसच्या वेळेस त्याला नाश्ता, जेवण आणि त्याची औषधे पूर्णपणे मोफत मिळायची. प्रत्येक वेळेला स्टाफपैकी कोणीतरी त्याला त्याच्या रिक्षा स्टॉपपर्यंत किंवा त्याच्या घरापर्यंत सोडायचे. परंतु हे सारेच आता त्याच्या मृत्यूने थांबवले.
हळहळ लावून गेला...वेदना असूनही स्वतःच्या आजारपणाचे त्याने कधीही भांडवल केले नाही. रविवारी (दि.२६) पहाटे त्याला अचानक धाप लागण्याचा त्रास वाढला. रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत मृत्यूने त्याला वाटेतच गाठले. तो राहत असलेले उचगाव आणि रुग्णालयातील सारेच हळहळले. अभ्या तसा कुणाचाच नव्हता, परंतु सगळ्यांनाच आपलेसे करून गेला.