विक्रम पाटील
करंजफेन : ग्रामदैवत हनुमानाला अभिषेक आणि साऱ्या गावासाठी शाकाहारी जेवणाचा बेत आखून पन्हाळा तालुक्यातील निवडे गावाने ३१ डिसेंबर अनोख्या पद्धतीने साजरा केला. किमान या एका दिवशी तरी तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यामागे होता.
पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत ३१ डिसेंबर साजरा करून व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या युवा वर्गाला पायबंद घालण्याच्या हेतूने ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामदैवत हनुमानाला अभिषेक घातला. शाकाहारी जेवण बनवून गाव जेवणाची मेजवानी केली. कासारी नदी काठावर वसलेल्या जेमतेम दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावाचा हा अनोखा उपक्रम कौतुकाचा ठरला. गावातील गटतट बाजूला ठेऊन ग्रामस्थांनी एकत्रित पंगतीने स्नेहभोजनाचा लाभ घेतला. ३१ डिसेंबरच्या नावाखाली तरुण पिढी डाॅल्बी व ओल्या पार्ट्या करून रात्र जागवत असल्याचे व नवी पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याचे गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप म्हणून गावामध्ये शाकाहारी गाव जेवण करण्याचा मुद्दा पुढे आला.
त्याला गावातील लहान-थोर मंडळींनी होकार दर्शवल्याने ग्रामदैवत हनुमान मंदिराजवळ गाव जेवणाची तयारी करण्यात आली. गावातील प्रत्येकाने मदत देऊन या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून जेवणावळी पडल्या. गावातील तरुणाई जेवण बनविण्यापासून ते पंगती वाढण्यापर्यंत पुढे राहिली..तरुणांच्या व्यसनाला लगाम घालण्यासाठी निवडे ग्रामस्थांनी राबविलेल्या अनोख्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
तरुण वर्गाची नव्या वर्षाची सुरुवातच व्यसनाने होते. ते टाळण्यासाठी ग्रामदैवत हनुमंताला अभिषेक घालून नवीन वर्षे सुखाचे जावे म्हणून प्रार्थना करत गावाने शाकाहारी गाव जेवणाचा पायंडा पाडला आहे. व्यसनापासून तरुणांना परावृत्त करण्याचा प्रयत्न आहे.उज्ज्वला सुतार, सरपंच, निवडे (ता. पन्हाळा)