सचिन भोसले -कोल्हापूर -राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या गुणीजनखाना यांच्या अनुसंधानात खासबाग, कोल्हापूर येथील सरकारी इमारतीत, सरकारी अनुदानावर १९१५ साली ‘शारदा संगीत विद्यालय’ या संस्थेची स्थापना केली. ‘किराणा घराणा’ गायकीचे प्रतिनिधित्व करणारे कोल्हापूरचे उच्चपदस्थ ‘ख्याल’ गायक पंडित विश्वनाथबुवा जाधव यांना महाराजांनी या संस्थेचे संस्थापक-प्राचार्य नेमले. पुढे शाहू महाराज यांची कृपादृष्टी सतत असल्यामुळे पं. विश्वनाथबुवा यांना राजदरबारातसुद्धा विशेष स्थान होते. १९२० च्या ‘नवरात्रौत्सव’मध्ये शाहू महाराजांनी बुवांच्या गायनावर प्रसन्न होऊन त्यांचा सन्मान करीत ‘राजमान्य दरबार गायक’ म्हणून आदराने त्यांची नियुक्ती केली. या दरम्यान बुवांनी गोडबोले, व्यास, गद्रे, आठल्ये, आदी अनेक होतकरू शिष्य तयार केले. याचबरोबर बुवांनी करवीर दरबारातील सर्व लहान-थोर व्यक्तींना संगीतविद्या शिकविली. याच काळात बुवा छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई साहेब यांना संगीतसाधना व रियाज यांची तालीम देत असत. आपल्याबरोबर आपली पुढील पिढीही याच संगीत साधनेत पारंगत होऊन आपला वारसा तितक्याच जोमाने पुढे चालवावा म्हणून त्यांनी आपल्या संगीत विद्यालयात अनेक शिष्य तयार केले. गायकपुत्र ‘गानतपस्वी’ पंडित बाबूराव तथा बी. व्ही. जाधव, स्वररत्न राजाराम तथा आर. व्ही. व पंडित पांडुरंग जाधव या सर्वांनी मोठे सांगीतिक कार्य केले. पुढे विश्वनाथबुवांचे गायन ऐकून म्हैसूरचे महाराज श्रीमंत ‘नलवडी’ कृष्णराज वाडियार यांनी १९३६ सालच्या दसरा महोत्सवात बुवांना ‘प्रौढ गंधर्व ’हा बहुमान बहाल केला. करवीर संस्थानच्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात त्याकाळी अंबाबाई देवीसमोर व भवानी मंडपात तेथील देवीसमोर विश्वनाथबुवा व गायकपुत्र दरबार गवई या नात्याने प्रतिवर्षी जाहीररीत्या गायन केले. १९४० मध्ये राजाराम महाराजांनी त्यांना करवीर नगरीतील ‘गंधर्व परिवार’ ही पदवी दिली. यामध्ये ‘शारदा संगीत विद्यालय’ ही संस्था छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार राजाराम महाराजांनी संस्थानाकडून योग्य तऱ्हेने सहकार्य देण्याचे आदेश दिले; परंतु राजाराम महाराज यांचे आकस्मात निधन झाले. त्यामुळे पुढे या कार्यास मुहूर्त लागला नाही. त्यानंतर पंडित विश्वनाथबुवा बळवंतराव जाधव यांनी विद्यालयाच्या रूपाने संगीतसेवा अविरतपणे सुरू ठेवली. पंडित विश्वनाथबुवा यांना १ सप्टेंबर १९६४ रोजी देवाज्ञा झाली आणि शारदा संगीत विद्यालयाची धुरा त्यांच्या गायकपुत्रांनी हाती घेतली. १९६५ साली कोल्हापूर शहर रस्ता रुंदीकरणावेळी ‘शारदा संगीत विद्यालय’ या संस्थेचे पुनर्वसन व छत्रपती शाहू महाराज यांच्या संगीत कलेला उत्तेजन देण्याची दूरदृष्टी व दूरदर्शी योजना लक्षात घेऊन श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांनी छत्रपती कल्चरल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट न्यू पॅलेस, कोल्हापूर यांच्या अंतर्गत शारदा संगीत विद्यालयाची पुनर्स्थापना ‘श्री शाहू छत्रपती संगीत विद्यालय’ अशी भवानी मंडप, कोल्हापूर या ठिकाणी केली. प्राचार्य म्हणून पंडित बाबूराव जाधव यांची स्थापनेपासून नियुक्ती झाली. १९७८ ते १९९१ पर्यंत पंडित निळकंठबुवा चिखलीकर हे दरबार गवई व संस्थेचे प्राचार्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर आजतागायत पंडित अरुण नारायण जेरे हे दरबार गवई व प्राचार्यपदाची धुरा वाहत आहेत. संस्थेचा कार्यविस्तार झाला असून नाशिक येथेही कार्यालय उभे करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून मंगला राजाराम जाधव, तर सचिव म्हणून अजित जाधव काम पाहत आहेत. पंडित डी. व्ही. जाधव, पंडित आर. व्ही. जाधव यांच्या स्मरणार्थही विशेष सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.दुग्धशर्करा योगपंडित बाबूराव जाधव यांची जन्मशताब्दी व ‘शारदा संगीत विद्यालय’ पुनर्स्थापित श्री शाहू छत्रपती संगीत विद्यालयाची शताब्दीपूर्ती असा दुग्धशर्करा योग डिसेंबर २०१५ मध्ये जुळून आला. यानिमित्त ‘प्रौढ गंधर्व मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर’ या संस्थेतर्फे कसबा गेट पोलीस चौकीजवळील पंडित विश्वनाथबुवा जाधव चौक, गंगावेश येथे खास निमंत्रितांसाठी विशेष समारंभ आयोजित केला होता. यावेळी प्रौढ गंधर्व लेगसी सर्टिफिकेट देऊन प्राचार्य पंडित अरुण जेरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात श्रीमती राधिका राघवेंद्र पंडित यांचे सुश्राव्य गायन झाले. पंडित बाबूराव जाधव यांचे शिष्यांसाठी योगदानपंडित बाबूराव जाधव यांनी अखेरच्या श्वासापर्यंत येथे विद्यादान करीत मोठी शिष्यशाखा निर्माण केली. यामध्ये श्रीमती गुलाबबाई कागलकर, एम. जी. पटवर्धन व पंडित निळकंठबुवा चिखलीकर या विद्यालयात तालीम घेत होते. या दरम्यान विश्वनाथबुवांचे शिष्य असलेले सुधाकरबुवा डिग्रजकर यांचेसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. देशपातळीवर गौरव४ एप्रिल १९५२ रोजी ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिल्ली येथे भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पंडित विश्वनाथबुवा बळवंतराव जाधव यांचा संगीत विद्वत्तेबाबत यथोचित गौरव करण्यात आला.
महिलांच्या हस्ते अभिषेक, महापूजा
By admin | Published: April 11, 2016 12:21 AM