कोल्हापूर : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पालकमंत्री सतेज पाटील यांनी या वर्षीचे अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने घालू असे वक्तव्य केले होते. या पालकमंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ माजी महापौर सुनील कदम यांनी दिवाळी दिवशी म्हणजेच गुरुवारी महानगरपालिकेच्या दारात अभ्यंगस्नान केले.
गुरुवारी सकाळी ६ वाजता पंचगंगा नदीचे पाणी बादली भरून आणून माजी महापौर सुनील कदम यांनी महानगरपालिकेच्या दारात अभ्यंगस्नान केले. यावेळी सत्यजित कदम, चंद्रकांत घाटगे, आशिष ढवळे आदी माजी नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी कोल्हापूरच्या शहरवासीयांच्या दृष्टीने ती वक्तव्ये दिवास्वप्नात राहिलेली आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आमिष दाखवून मते मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांनी अशाप्रकारची वक्तव्ये करून जनतेची चेष्टा केली म्हणून भाजपा-ताराराणी आघाडीच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी आवाज उठवला, असे सांगण्यात आले.
दरम्यान, कोल्हापूर थेट पाईपलाइन योजनेचे काम गेले सहा वर्षे सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी दिली होती. पुढील वर्षी या पाण्यानेच कोल्हापूरकर अभ्यंगस्नान करतील, असा शब्द सुद्धा यावेळी देण्यात आला होता.