कोल्हापूर : कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण स्फोटातील बकेटवर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर (रा. गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असा कन्नड, तमिळी आणि इंग्रजी भाषांत नामोल्लेख आढळल्याने महाराष्ट्र-कर्नाटकात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी आमदार आबिटकर यांच्याकडे तासभर चौकशी केली. या प्रकरणाशी माझा काही संबंध नसून, आपल्या बदनामीचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. स्फोटकाचे पार्सल माझ्या घरी पाठवून माझा व कुटुंबीयांचा घातपात घडविण्याचा कट असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार आबिटकर यांनी केली. कोल्हापूर ‘एटीएस’चे पथक हुबळीमध्ये ठाण मांडून असून, चौकशी करीत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्फोटकावर शिवसेनेचे आमदार आबिटकर यांच्या नावाचा उल्लेख आढळून आल्याने महाराष्ट्र-कर्नाटकात खळबळ उडाली. आबिटकर हे राधानगरी येथील विद्यमान आमदार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार असल्याने कोल्हापूरसह कर्नाटक एटीएस, एसआयटीसह रेल्वे पोलिसांचे त्यांच्याकडे लक्ष लागले. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी याप्रकरणी आमदार आबिटकर यांच्याकडे तासभर चर्चा केली. कर्नाटकशी तुमचे काही कनेक्शन आहे का, काही व्यवहार आहेत का, कोणी तुमच्याकडून दुखावले आहे का, आदी माहिती घेतली. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत आबिटकर यांचा नामोल्लेख स्फोटकांच्या बकेटवर कसा आला, त्या यंत्रणेपर्यंत पोहोचण्यासाठी कोल्हापूर आणि कर्नाटक पोलीस संयुक्त तपास करीत असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.बदनामीचे षड्यंत्र : प्रकाश आबिटकरसामाजिक, राजकीय क्षेत्रांत वावरताना अशा घटनांशी आपला यापूर्वी कधीही दुरान्वयेही संबंध आला नाही. दिवसभर आपल्या नावाची मीडियाद्वारे चर्चा पुढे आल्याने आपण स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपल्या बदनामीचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. स्फोटकाचे पार्सल माझ्या घरी पाठवून माझा व कुटुंबीयांचा घातपात घडविण्याचा कट असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित रॅकेटचा छडा लावावा, अशी मागणी केली आहे.