गारगोटी :
भुदरगड तालुक्यातील हेदवडे, गिरगांव, पाळेवाडी, कोळवण, भाटिवडे, नवरसवाडी, मोरेवाडी आदी गावांना महत्त्वपूर्ण असणाऱ्या लघु पाटबंधारे प्रकल्प, फये प्रकल्पाच्या पाणी नियोजन व दुरुस्ती कामाचा आढावा आमदार प्रकाश आबिटकर यांनी घेतला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रकल्पाला लागलेल्या गळतीमुळे पाण्याचा होणारा अपव्यय व त्यामुळे होणारे शेतीचे नुकसान तसेच केटीवेअरची दुरुस्ती याकडे लक्ष वेधले. तसेच प्रकल्पाची व केटीवेअरची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली.
यावेळी पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी संभाजी भोपळे यांनी आतापर्यंत प्रकल्पामधून एकही आवर्तन केलेले नसून ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे पाणी सोडण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी आमदार आबिटकर म्हणाले, प्रकल्पातून आवर्तन न करता देखील प्रकल्पाला लागलेल्या गळतीमुळे ३५टक्के पाण्याचा अपव्यय झालेला आहे. याबाबत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच प्रकल्पातील गाळ काढणे गरजेचे असल्याचे सांगत केटीवेअरचीदेखील दुरुस्ती, व्हॉल्व्ह दुरुस्ती करून गळती थांबविणे आदी कामे तत्काळ करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी बाजार समितीचे संचालक कल्याणराव निकम यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस सूर्याजी देसाई, प्रवीण नलवडे, पाटबंधारे उपविभागीय अधिकारी संभाजी भोपळे, शाखा अभियंता मनोज देसाई, एम. डी. पाटील, अनंत डोंगरकर , बाळासो गुरव, बाळासाहेब देसाई, अविनाश देसाई, शिवाजी देसाई, एकनाथ पांगम, प्रकाश पाटील, भगवान देसाई यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
२५ फये आबिटकर बैठक
फोटो : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये बोलताना आमदार प्रकाश आबिटकर. सोबत सूर्याजी देसाई, प्रवीण नलवडे, पाटबंधारे उपविभागीय अधिकारी संभाजी भोपळे आदी.