कोल्हापूर : गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा करणारा निकेश कुशल राज बोहरा (वय ४०, रा. बंगळुरू, कर्नाटक) याला करवीर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. त्याने विक्रेत्यांना किती गोळ्यांचा पुरवठा केला याचा तपास सुरू आहे. गर्भलिंग निदान करण्यासाठी सोनोग्राफी मशीन पुरवणाऱ्या संशयितांचाही शोध सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली.आरोग्य विभागाने कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये छापा मारून केलेल्या कारवाईत गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर करवीर पोलिस मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा तपास करताना पोलिसांना कर्नाटकातील पुरवठादाराची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बंगळुरू येथे जाऊन निकेश बोहरा याला अटक केली. त्याची राजेश ड्रग्ज ही फर्म असून, त्याद्वारे त्याने कोल्हापुरात अनेक विक्रेत्यांना गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने आजवर विकलेल्या गोळ्यांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले मोबाइल सोनोग्राफी मशीनही कर्नाटकातून आणल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानुसार मशीनची विक्री करणाऱ्या संशयितांना अटक करणार असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.
Kolhapur: गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा करणारा सापडला, बंगळुरूतून निकेश बोहरा याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:23 IST