कोल्हापूर : अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीला गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा करणारा सुयश सुनील हुकेरी (वय २७, रा. सर्वेश पार्क, फुलेवाडी, कोल्हापूर) याला करवीर पोलिसांनी फुलेवाडी नाक्यावर सापळा रचून अटक केली. रविवारी (दि. १९) न्यायालयात हजर केले असता, त्याची बुधवारपर्यंत (दि. २२) पोलिस कोठडीत रवानगी झाली. पोलिसांनी त्याच्याकडून ४० हजार रुपयांचा गोळ्यांचा साठा जप्त केला.अवैध गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या रॅकेटच्या मुळाशी पोहोचण्याचे काम करवीर पोलिसांकडून सुरू आहे. बोगस डॉक्टर आणि एजंटच्या अटकेनंतर गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. फुलेवाडी येथील सुयश हुकेरी याच्याकड़ून गोळ्यांचा पुरवठा झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शनिवारी (दि. १८) रात्री फुलेवाडी नाका येथे सापळा रचून हुकेरी याला अटक केली. त्याच्याकडे असलेल्या सॅकची झडती घेतली असता, त्यात ४० हजार रुपयांच्या गर्भपाताच्या गोळ्या सापडल्या. पोलिसांनी गोळ्या जप्त करून त्या कोणाकडून आणल्या होत्या, याचा शोध सुरू केला आहे. गोळ्यांचे बेकायदेशीर वितरण करणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत.४७० रुपयांचे पाकीट ३ हजारांनापोलिसांनी जप्त केलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांच्या एका पाकिटाची किंमत ४७० रुपये आहे. मात्र, अटकेतील संशयिताकडून याच एका पाकिटाची सुमारे ३ हजार रुपयांना विक्री केली जात होती, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुयशचे शिक्षण बीसीएअटकेतील सुयश हुकेरी याचे शिक्षण बीसीए झाले असून, वैद्यकीय क्षेत्राशी त्याचा काहीच संबंध नाही. तरीही गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो या क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने आजवर किती गोळ्यांची विक्री केली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.