सांगली/म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या ‘रॅकेट’चा सांगली पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. कनवाड (ता. शिरोळ) येथील बाबासाहेब खिद्रापुरे या बीएचएमएस डॉक्टरने म्हैसाळमध्ये रुग्णालय सुरू करून हा उद्योग केल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हैसाळच्या ओढ्यालगत गर्भपात करून दफन केलेले १९ भ्रूण पोलिसांना सापडले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मणेराजुरी (ता. मिरज) येथील स्वाती प्रवीण जमदाडे (वय २५) या विवाहितेचा चार दिवसांपूर्वी डॉ. खिद्रापुरे याने गर्भपात केला होता. त्यावेळी स्वातीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तिचा पती व डॉ. खिद्रापुरे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करताना पोलिसांना, खिद्रापुरे याचा गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा गर्भपाताचा हा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेऊन पोलिसांनी खिद्रापुरेच्या रुग्णालयावर छापा टाकला असता, या छाप्यात अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. तसेच तो बेकायदा गर्भपात करीत असल्याची बाहेरून गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे रविवारी सकाळपासून म्हैसाळच्या ओढ्यालगत जेसीबीच्या मदतीने खुदाई सुरु ठेवण्यात आली. सायंकाळपर्यंत तेथे दफन केलेले १९ भ्रूण सापडले आहेत. कदाचित हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे वृत्त समजताच खिद्रापुरे हा कुटुंबासह फरार झाला आहे. मणेराजुरीतील विवाहितेचा मृत्यू गर्भपात करतानाच झाल्याचे शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणीत स्पष्ट झाले होते. याचा तपास व पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी खिद्रापुरेच्या रुग्णालयावर छापा टाकला. या छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे, यंत्रसामग्री आढळून आली. गर्भपात करण्यापूर्वी महिलांना भूल दिली होती. यासाठी भूलतज्ज्ञांना बोलावून त्यांना दिलेल्या ‘फी’चे रजिस्टरही सापडले. गर्भपात करण्यासाठी लागणारे साहित्यही सापडले. जिल्ह्णासह अन्य गावांतून कुटुंबनियोजन तसेच गर्भपात करण्यासाठी येथे महिला आल्या होत्या. त्यांच्या नावांचेही रजिस्टर आढळून आले. खिद्रापुरे याने बीएचएमएस पदवी घेतली आहे. तसे प्रमाणपत्रही सापडले आहे. तो स्त्रीरोगतज्ज्ञ नसतानाही त्याने महिलांचा बेकायदा गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पंचनाम्यावेळी आढळून आल्यानंतर या ‘रॅकेट’चा पर्दाफाश झाला. (प्रतिनिधी/वार्ताहर)चौकट...ज्ञान नसताना गर्भपात : शिंदेपोलिसप्रमुख शिंदे म्हणाले, खिद्रापुरे याला गर्भपात करण्याचे कोणतेही ज्ञान अथवा कौशल्य नव्हते. हा सारा उद्योग त्याने बेकायदेशीरपणे सुरु ठेवला होता. रुग्णालयात गर्भपाताच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्यही ठेवले होते. प्रसुतीगृह सुुरु ठेवले होते. भूलतज्ज्ञांना बोलावून त्याने हे गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची पत्नीही डॉक्टर आहे. तिचा यामध्ये कितपत सहभाग आहे, याचा तपासातून उलगडा केला जाईल. .महिलांशी संपर्कज्या महिलांचे गर्भपात केले आहेत, त्या महिलांच्या नावाचे रजिस्टर सापडले आहे. या सर्व महिलांशी पोलिस संपर्क साधणार आहेत. त्यांनी गर्भपात कशासाठी व कधी केला? त्यांना या डॉक्टरबद्दल कोणी माहिती दिली? याची चौकशी केली जाणार आहे. मुलगी होती म्हणून महिलांचा गर्भपात केला का? याचा उलगडा केला जाणार आहे. गर्भ मोठा असेल तर विल्हेवाटगर्भपात करताना भ्रूण मोठा असल्याचे आढळून आल्यास खिद्रापुरे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी देत होता. गावातच ओढ्यालगत भ्रूणाचे दफन केले जात होते. भ्रूण दफन करण्यास तो कोणाची मदत घेत होता, याची माहिती अजूनही मिळालेली नाही. पण तपासातून सर्व बाबी उजेडात आणल्या जातील. सध्याच्या स्थितीला केवळ गर्भपात केलेले १९ मृत भ्रूण सापडले आहेत. खिद्रापुरे हा फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. यासाठी कोणत्या भूलतज्ज्ञाची मदत घेतली जात होती, याचा तपास केला जात आहे, असे शिंदे म्हणाले.
म्हैसाळमध्ये गर्भपात ‘रॅकेट’चा पर्दाफाश!
By admin | Published: March 05, 2017 11:59 PM