सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथे बेकायदा गर्भपात करणारा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे महिलांचे गर्भपात मध्यरात्री करायचा आणि पहाटे गाव झोपेत असताना एका दूध विक्रेत्याची मदत घेऊन त्याची विल्हेवाट लावायचा, अशी माहिती पुढे येत आहे. त्याच्या ‘रॅकेट’मधील कागवाड (ता. अथणी) येथील डॉ. श्रीहरी घोडके हा गरोदर महिलांचे गर्भलिंग निदान करून मुलगा असला तरी, मुलगीच आहे, असा अहवाल द्यायचा. त्यांच्या या कृत्यामुळे तपास करणारी पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली आहे.खिद्रापुरेने गेल्या आठवड्यात स्वाती जमदाडे (मणेराजुरी) यांचा गर्भपात केला होता. यामध्ये स्वाती यांचा मृत्यू झाला. या घटनेची तीव्रता वाढत गेल्याने पोलिसांनी गतीने तपास सुरू केला. स्वातीच्या माहेरकडील लोकांनी पती व डॉ. खिद्रापुरे या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. खिद्रापुरेच्या रुग्णालयावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे व गर्भपातासाठी लागणारी औषधे सापडली. गर्भपात केलेले भ्रूण त्याने म्हैसाळमध्ये ओढ्यालगत पुरले होते. जेसीबीच्या मदतीने ओढ्यालगत खुदाई केल्यानंतर १९ भ्रूण सापडले. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर तसेच अधिवेशनामध्येही चर्चेत आले. पोलिस आणि वैद्यकीय समिती या प्रकरणाची चौकशी करीत आहे. चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. भ्रूणहत्येच्या ‘रॅकेट’मध्ये आतापर्यंत नऊजणांना अटक झाली आहे. यामध्ये तीन डॉक्टर आहेत. डॉ. श्रीहरी घोडके याच्याकडे सांगलीसह कर्नाटकातील गरोदर महिलांची गर्भलिंग निदान तपासणी करण्यास नेहमी गर्दी असे. गर्भलिंग तपासणी करताना त्याला मुलगा आहे की मुलगी, याचे निदान लागत असे. पण जाणीवपूर्वक महिलांना मुलगी आहे, असा अहवाल तो देत असे. त्यामुळे मुलाच्या हव्यासातील महिला व तिच्या कुटुंबास गर्भ कोठे खाली करायचा, असा प्रश्न पडायचा. त्यानंतर घोडके हा खिद्रापुरेचे नाव सुचवत असे. त्याने आतापर्यंत किती महिलांना मुलगा असूनही मुलगी असल्याचा अहवाल दिला असेल, हे सांगता येत नाही. पण मुलगा असताना त्या भ्रूणाचीही हत्या झाल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून्ा पुढे येत आहे. अटकेत असलेला विजापूरचा डॉ. रमेश देवगीकर हाही महिलांची गर्भलिंग निदान तपासणी करीत होता, पण तो मुलगा आहे की मुलगी, हे अचूक सांगत असे. कर्नाटकातील आणखी काही डॉक्टर व एजंटांची नावे निष्पन्न होत आहेत. त्यानुसार पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे. (प्रतिनिधी)महिलांचा प्रवेश : रात्री बारानंतरगर्भपात करण्याचे काम खिद्रापुरे म्हैसाळ गाव झोपल्यानंतर करत असे. यासाठी तो महिलांना रात्री बारा वाजता स्वत:च्या रुग्णालयात दाखल करून घेत असे. त्यानंतर त्याची गर्भपात करण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. महिलांना गोळ्या व इंजेक्शन दिल्यामुळे अडीच-तीनपर्यंत गर्भपात करण्यात तो यशस्वी व्हायचा. गर्भ मोठा असेल तर तो निळ्या रंगाच्या पिशवीत घालून ठेवत असे. अन्यथा टॉयलेटमध्ये टाकत असे. महिलेची प्रकृती पाहून तो त्यांना घरी जाण्याचा सल्ला देत असे.तो दूध विक्रेता कोण?खिद्रापुरेकडे पहाटे एक दूध विक्रेता येत असे. त्याला थोडी-फार रक्कम देऊन गर्भपात केलेले भ्रूण विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपविली जात होती, अशी माहिती पुढे येत आहे. पण प्रत्यक्षात पोलिसांनी जाहीर केलेले नाही. तपास करताना पुरावे व साक्षीदार गोळा करण्याचे काम महत्त्वाचे असल्याने पोलिसांनी अनेक बाबींविषयी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. पण ‘रॅकेट’ उघडकीस आल्यानंतर या सर्व बाबींची आता उघडपणे चर्चा सुरू झाली आहे.
गर्भपात मध्यरात्री, विल्हेवाट पहाटे!
By admin | Published: March 11, 2017 11:12 PM