लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली आहे. याच्यासह कोरोना रुग्णांना लागणाऱ्या औषधी व सिलिंडरची सुमारे ८९ लाख ९० हजार ७६० रुपयांची देयके थकली आहेत. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील आयजीएम रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्यानुसार कोल्हापूर सीपीआरच्या धर्तीवर येथील रुग्णालयात सहा हजार लिटरचा ऑक्सिजन टँक बसविण्यात आला आहे. याचा ठेका कोल्हापूर ऑक्सिजन या कंपनीस देण्यात आला आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन दिले जात असून, आतापर्यंत सुमारे सात ऑक्सिजन टॅँकर पुरविण्यात आले आहेत.
या ऑक्सिजनसह अन्य लहान ऑक्सिजन सिलिंडर, औषध पुरवठा संस्था यांची देयके थकली आहेत. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णालयामध्ये शंभरच्या वर रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा ऑक्सिजन टाकी, औषध पुरवठा लागणार आहे. याकडे शासनाने गांभीर्याने पाहावे.
चौकटी
किरकोळ देयके चौदा लाखांची
रुग्णालयामध्ये जम्बो सिलिंडर, युरा वॉर्ड सिलिंडर, पुनर्भरण अशा विविध सिलिंडरसाठी लागणाऱ्या पुरवठ्याची देयकेही थकली आहेत. ही देयके सुमारे तेरा लाख ९४ हजार रुपयांची असल्याचे समजते.
५० टक्के झाला वापर
सहा हजार लिटरच्या लिक्विड ऑक्सिजन टाकीतील ऑक्सिजन गेल्या महिनाभरापासून रुग्णांना पुरवठा केला जात आहे. त्यामुळे त्यात सध्या तीन हजार ६०० लिटर शिल्लक आहे. रुग्णसंख्या वाढल्यास जास्त प्रमाणात वापर होतो.