कोल्हापूर : कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सुरू असलेल्या ज्येष्ठ व व्याधीग्रस्तांच्या लसीकरणाने वेग धरला असून पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने दुसऱ्या दिवशी ३ हजार ४७२ जणांनी लस टोचून घेतली. त्यामुळे आतापर्यंत लस घेतलेल्यांचा आकडा ५ हजार ६९८ वर पोहोचला आहे.
कोरोना संसर्गापासून बचावासाठी कोविड लसीकरण सोमवारपासून सुरू झाले आहे. यात ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त, तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यासाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील १२० केंद्रे निश्चित केली आहेत.
कोल्हापुरात पहिले दोन दिवस आरोग्य यंत्रणेचे नियोजनात गेल्यानंतर खऱ्याअर्थाने बुधवारपासून प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात झाली. बुधवारी ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त ४५७, तर १७६९ ज्येष्ठ अशा २२२६ जणांनी लस आरोग्य केंद्रावर जाऊन टोचून घेतली. गुरुवारीही लसीकरणासाठी प्रतिसाद वाढला. ४९० व्याधीग्रस्त, तर २९८२ ज्येष्ठ असे एकूण ३ हजार ७२ जणांनी लसीकरण करून घेतले.
सरकारी आरोग्य केंद्रात मोफत लसीकरण असल्याने साहजिकच गर्दी जास्त आहे. खासगी रुग्णालयातही अहोरात्र लसीकरणाची सोय केली आहे. तेथे अडीचशे रुपये फी आकारण्यात येत आहे. ज्यांना परवडते ते नागरिक खासगीमध्ये जाताना दिसत आहेत, पण सरकारीकडे ओढा जास्त असल्याचे शहरातील केंद्रावर झालेल्या गर्दीवरून दिसत आहे.
चौकट ०१
वेबसाईटवर नाेंदणी वाढली
लसीकरण करण्याकरिता कोविड या वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठीही प्रतिसाद वाढत आहे. मंगळवारी ४ हजार नागरिकांनी यावर नाेंदणी केली होती, ती बुधवारी आठ हजारावर गेली.
चौकट ०२
नियमित लसीकरण सुरूच
ज्येष्ठ आणि व्याधीग्रस्तांबरोबरच नियमित लसीकरणही सुरूच आहे. यात हेल्थ वर्कर २८ हजार ५३७, तर फ्रंटलाईनवरील १० हजार ६६४ जणांनी आतापर्यंत कोविड लस टोचून घेतली आहे.