जयसिंगपूर : महाविकास आघाडी सरकारकडून आपत्तीबाबत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये समन्वय ठेवला जात आहे. येणाऱ्या काळात महापुराचा धोका टाळण्यासाठी दोन्ही जलसंपदा मंत्र्यांची बैठक घेतली जाईल. कशा पद्धतीने नियोजन करता येईल, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. महापुराचे संकट परत शिरोळ तालुक्यावर येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जयसिंगपूर येथील स्व.शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
विविध विभागातील अधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीची माहिती विशद केली. यावेळी 'अंकुश'चे धनाजी चुडमुंगे यांनी सूचना मांडल्या. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपत्ती आल्यास नागरिकांनीदेखील स्थलांतरणासाठी प्रशासनाला मदत करावी असे सांगितले.
कामचुकारांची गय केली जाणार नाही
पावसाळ्यापूर्वी ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या मार्गी लावण्याच्या सूचनादेखील राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिल्या. आपत्ती काळात कामचुकारांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आढावा बैठकीत बांधकाम विभागाचे अभियंता बागवान यांचा मंत्री यड्रावकर यांनी चांगला समाचार घेतला.