लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. लॉकडाऊननंतर हातगाडी व्यावसायिकाच्या संख्येतही दुप्पट वाढ झाल्याचे प्राथमिक सर्व्हेक्षणात आढळले. कोरोनाच्या संसर्गात अनेकांच्या व्यवसाय, नोकरीवर गंडांतर आल्याने रिक्षाचालकांसह अनेकांनी भाजी, फळविक्रीचा मार्ग निवडला आहे. लॉकडाऊनपूर्वी शहरात रस्त्यांवरील हातगाडी व्यावसायिकांची संख्या ही सुमारे १८०० पर्यंत होती; पण लॉकडाऊननंतर ती सुमारे ४००० पर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला. शहरात हातगाडी व्यावसायिक, वाहनदुरुस्ती, चारचाकी वाहनांचे ॲक्सेसरीज, हॉटेल व्यावसायिक, विविध शोरूम हे चक्क रस्त्याकडेला थाटल्याने रस्ताच अरुंद बनला आहे. वाहन पार्किंगही रस्त्यांवरच असल्याने वाहने धावण्यासाठी रस्ता अरुंद बनला आहे. परिणामी शहरात सर्वत्र वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने प्रत्येकाने भाजीपाला, फळविक्रीचे व्यवसाय निवडले. त्यामुळे शहरात हातगाडी व्यावसायिकांची संख्या दुपटीने वाढली. शिवाय मिनी टेम्पोतून खाद्यपदार्थ व भाजीविक्रीही उपनगरांत रस्त्याकडेला उभे राहून केली जाते.
हातगाड्या भाड्याने
शहरातील बिंदू चौक, हॉकी स्टेडियम, महालक्ष्मीनगर या तीन ठिकाणी काहींनी हातगाड्या बनवून त्या व्यवसायासाठी दरदिवसा ५० रुपये भाडेपट्टीवर दिल्याची माहिती पोलीस खात्यास व अतिक्रमण विभागास मिळाली आहे. यातील एकाच्या मालकीच्या सुमारे हजाराहून अधिक हातगाड्या भाड्याने दिल्याचे समजते. अतिक्रमण विभागाची कारवाई झाल्यास भाडेकरूनेच ती सोडवून मालकाच्या ताब्यात द्यायची आहे.
नगरसेवकांचा फोन येतोच...
भाडेपट्टीने दिलेल्या हातगाड्यांवर बहुतांश व्यावसायिक हे परप्रांतीय आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्यास अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित नगरसेवकाचा फोन तातडीने येतो; पण स्थानिक हातगाडीचालकांवर कारवाई झाल्यास क्वचितच नगरसेवकांचा फोन येत असल्याची माहिती प्रशासनाला दिली आहे.
पोलीस, महापालिका, आरटीओची आज एकत्रित बैठक
दरम्यान, वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आज, गुरुवारी सकाळी १०.३० वाजता पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकारी, महापालिका आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची एकत्रित बैठक होत आहे.