दीपक जाधवकोल्हापूर : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय असे २१ रुग्णालय येत असून, त्यांपैकी एकूण आठ ठिकाणी सोनोग्राफी मशिन आहेत. त्यांपैकी पाच मशिन चालू असून त्यांतील चार ठिकाणी अल्ट्रासाऊंड मशिन आहेत; मात्र या रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने गरोदर मातांना सोनोग्राफीसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.शासकीय रुग्णालयात कमी पैशात सोनोग्राफी होत असल्याने रुग्ण येतात; पण रेडिओलॉजिस्ट नसल्याने खासगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी १५०० ते २००० रुपये मोजावे लागतात. सरकारी रुग्णालयात डाॅक्टरांअभावी तर खासगी रुग्णालयात पैशांअभावी सोनोग्राफी होत नसल्याने रुग्णाला घरी परतण्याशिवाय पर्याय उरत नाही. याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होतो. अशा स्थितीत आरोग्य विभागाकडून डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठी अडचण होत आहे.गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशिन असून तिथे जिल्ह्यातील एकमेव रेडिओलॉजिस्ट उपलब्ध आहेत. तिथे काम व्यवस्थित सुरू आहे. इचलकरंजी, कसबा बावडा, कोडोली, गारगोटी, नेसरी, हातकणंगले व दत्तवाड या उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत मशिन उपलब्ध आहेत. यातील नेसरी, हातकणंगले व दत्तवाड येथील मशिन नादुरुस्त असून इतर ठिकाणी लाखोंची मशिन गेल्या दीड-दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहेत.
इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ या अल्ट्रासाऊंड चाचण्या करतात. आयजीएमचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. दिलीप वाडकर यांनी सांगितले की,रुग्णालयाकडील रेडिओलॉजिस्ट निवृत्त झाल्यानंतर अद्याप नवीन रेडिओलॉजिस्ट मिळाले नाहीत. गरोदर मातांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडून गर्भवती महिलांची सोनोग्राफी केली जाते. रिक्त पदांवर नियुक्ती करण्याची मागणी करणारे पत्र वरिष्ठांना पाठवले आहे.
रेडिओलॉजिस्ट काय करतात?रेडिओलॉजिस्ट हे विविध प्रकारच्या चाचण्यांद्वारे अंतर्गत आजार ओळखून कोणत्याही आजाराचे महत्त्व सिद्ध करतात. रेडिओलॉजिस्ट एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, अल्ट्रासाउंड यांसारख्या चाचण्या करतात. रेडिओलॉजिस्टच्या मदतीने शरीराच्या अंतर्गत भागात लपलेले रोग ओळखले जातात. ज्याद्वारे लोकांचे प्राणही वाचवता येतात.