कागल राज्यातील ग्रामीण भागाचा आत्मा असणारे ग्रामविकास खाते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्याकडे आले आहे. मी भरघोस निधी प्रत्येक गावाला देत आहे. येत्या चार वर्षांत असे काम करू या की, पुढील पंचवीस वर्षे गावात कामच शिल्लक राहणार नाही. जरी आमच्या विरोधी सत्ता असेल त्यांनाही गट, तट, पक्ष न पाहता भरघोस विकास निधी देणारच, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल येथे आज कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले मुश्रीफ गटाचे ३१८ ग्रामपंचायत सदस्य आणि नवनिर्वाचित ३६ सरपंच १९ उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्षा माणिक माळी, युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, वसंतराव धुरे, शशिकांत खोत, उपसभापती अंजना सुतार, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, प्रकाश गाडेकर आदी प्रमुख उपस्थितीत होते.
आपल्या भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले की, जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रतिसाद दिला आहे. ५३ पैकी ४६ सरपंच आमचे झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी सामान्य लोकांचे अश्रू पुसण्याचे काम करावे. गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
स्वागत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले. गावातील प्राथमिक शाळा चांगल्या होण्यासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन केले. यावेळी सतीश पाटील, भय्या माने यांची भाषणे झाली.
चौकट
पुढील जन्मी मदारी मेहतर
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेक दिन शासनाने शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यादिवशी सर्व ग्रामपंचायती, जिल्हा परिषदांवर भगवी गुढी उभी करून शिवरायांच्या विचारांचा जागर होणार आहे. मला अनेक जण म्हणत आहेत, तुम्ही चांगला निर्णय घेतला. मी त्यांना म्हणतो, मला तर पुढच्या जन्मी शिवरायांचा सेवक मदारी मेहतर व्हायची इच्छा आहे.
फोटो कॅप्शनसह पाठवीत आहे.