लोकमत न्यूज नेटवर्क
पांगिरे : बामणे (ता. भुदरगड) येथे ग्रामपंचायतीने एकाच वर्षात दोनवेळा घरपाळा वसूल केल्याचा प्रकार घडला असून, यातून कित्येक सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याची शंका आहे. या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता असल्याने याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी महेश बोरनाक यांनी भुदरगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बोरनाक यांनी आपल्या घराचा सन २०१९-२०चा घरपाळा २,७४५ रुपये हा दिनांक २७ऑगस्ट २०१९ रोजी भरला होता व रितसर पावती घेतली होती. त्यानंतर ते यावर्षीचा सन २०२०-२१चा घरपाळा भरण्यासाठी गेले असता, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मागील घरफाळा भरलेला असूनही तो जमा दाखवत नसल्याचे सांगितले व त्यांच्याकडून सन २०१९-२०चा व चालू २०२०-२१चा घरफाळा भरून घेऊन रितसर पावती दिली. ग्रामपंचायतीने माझ्याकडून घरफाळा दोनवेळा भरून घेतला असून, यामुळे आपली फसवणूक करण्यात आल्याचे बोरनाक यांनी म्हटले आहे. अशाचप्रकारे ग्रामपंचायतीने कित्येक सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता असून, यात खूप मोठा गैरव्यवहार झाला असावा, अशी शंका उपस्थित केली आहे. याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी महेश बोरनाक यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
चौकट -
अनेक ग्रामस्थांनी घरफाळा पैसे भरूनही जमा पुस्तकात त्याची नोंद केलेली नाही. केवळ नोंद दिसत नाही म्हणून घरफाळा भरलेला असतानाही पुन्हा भरून घेतला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे ग्रामस्थांना एकप्रकारे भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे भरलेला घरफाळा कोठे गेला, याची चौकशी व्हावी, अशी बोरनाक यांची मागणी आहे.
-
याबाबत सरपंच बाळासो जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, बामणे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून, ऑगस्ट २०२०पासून ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे घरफाळा वसुलीबाबत काही तक्रार असल्यास ग्रामसेवक व प्रशासक यांची जबाबदारी आहे. या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.