कोल्हापूर : आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या नराधम बापास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी (दि. ७) सुनावली. लक्षतीर्थ वसाहत परिसरात १० जानेवारी २०२० मध्ये गुन्हा घडला होता.सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई आणि मावस बहीण गल्लीत वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यावेळी घरात मोबाइलवर खेळत बसलेल्या आठ वर्षीय मुलीवर तिच्या बापानेच लैंगिक अत्याचार केला.
हा प्रकार पीडित मुलीच्या आईच्या निदर्शनास येताच तिने पतीला जाब विचारला. मात्र, चूक झाली. माफ कर. असे म्हणत त्याने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबत तिने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे आणि उपनिरीक्षक सुनीता शेळके यांनी गुन्ह्याचा तपास करून संशयिताच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.ॲड. पाटील यांनी न्यायाधीशांसमोर ९ साक्षीदार तपासले. पीडित मुलीसह तिची आई, मावस बहीण आणि वैद्यकीय अधिका-यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी आणि वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश अग्रवाल यांनी आरोपीस दोषी ठरवले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार धोंडिराम शिंदे यांनी काम पाहिले.