कोल्हापूर : कळंबा कारागृहातील अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्यास लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तुरुंगाधिकाऱ्यास अटक झाली. योगेश भास्कर पाटील (रा. तुरुंग अधिकारी निवासस्थान, कळंबा, मूळ रा. नागपूर) असे अटकेतील अधिकाऱ्याचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.पीडित महिला कळंबा कारागृहात शिपाई पदावर कार्यरत आहे. तुरुंगाधिकारी योगेश पाटील याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून २०२१ पासून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही दिवसांनी दोघांमध्ये वाद झाल्याने पीडितेने पाटील याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला.त्यानंतर त्याने जातिवाचक शिवीगाळ करून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पाटील याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण अधिक तपास करीत आहेत.कारागृहात खळबळकैद्यांकडे मोबाइल, गांजा सापडणे, कैद्यांच्या गटांमध्ये मारामारी होणे, अशा घटनांमुळे कळंबा कारागृहाची बदनामी झाली आहे. त्यातच आता वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाल्यामुळे पुन्हा कळंबा कारागृह प्रशासन चर्चेत आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार आणि जातिवाचक शिवीगाळ झाल्यामुळे या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे. संशयिताची वैद्यकीय तपासणी करण्यासह कॉल डिटेल्स तपासण्याचे काम सुरू आहे. - मंगेश चव्हाण - शहर पोलिस उपाधीक्षक