कोल्हापूर : अधिकाराचा गैरवापर करून खासगी जागेतील कामासाठी सार्वजनिक निधीची तरतूद करायला लावणे हे महानगरपालिका अधिनियमाच्या विरोधातील कृत्य आहे. म्हणूनच असे बेकायदेशीर काम केल्यामुळे महापौर निलोफर आजरेकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा त्यांच्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपतर्फे बुधवारी देण्यात आला.पक्षाचे महापालिकेतील गटनेते अजित ठाणेकर, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, अशोक देसाई, नगरसेवक विजय खाडे, तुषार देसाई, केशव उपाध्ये, आदींनी पत्रकार परिषदेत त्याची माहिती दिली.नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात महापौर आजरेकर यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या बाबूजमाल परिसरातील जागेत ड्रेनेजचे काम करण्याकरिता तीन लाख रुपयांची तरतूद केली आहे. सार्वजनिक निधीचा असा खासगी जागेत वापर होण्याचा हा पहिलाच प्रकार असून, तो बेकायदेशीर आहे.
ज्या दिवशी अंदाजपत्रक मंजूर झाले, त्याच दिवशी सही करून महापौरांनी त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. ज्या कामावर हा निधी खर्च केला जाणार आहे, त्याचे अजून एस्टिमेटही करण्यात आलेले नाही. महापौर हे महापालिकेचे विश्वस्त आहेत, मालक नाहीत. विश्वस्तांनीच अशा प्रकारे जनतेचा विश्वासघात केला आहे; म्हणून आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहोत. सात दिवसांत त्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांच्याविरोधात आंदोलन केले जाईल, असे ठाणेकर व चिकोडे यांनी सांगितले.नगरसेवक ठाणेकर म्हणाले, महापौरांनी राजीनामा दिला नाही अथवा त्यांचा राजीनामा घेतला नाही तर त्यांचे वरिष्ठ नेते महापौरांच्या गैरकृत्याचे समर्थन करतात व त्यांना पाठीशी घालत आहेत, असा समज होईल. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर कायदेशीर मार्गाने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रयत्न करू.