कोल्हापूर : अभाविप ही माणूस बनवणारी संघटना आहे, या संघटनेचे सदस्य असणे अभिमानाची गोष्ट आहे, असे सांगून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी विद्यार्थी परिषदेच्या गौरवशाली इतिहास देशाच्या स्वातंत्र्याच्या सोबतीने वाटचाल करत आहे, असे सांगितले.येथील स. म. महाविद्यालयाच्या मैदानावर दीप प्रज्वलनाने शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५७ व्या प्रदेश अधिवेशनाला प्रारंभ झाला. उद्योजक सुधीर मुतालिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री कुलकर्णी बोलत होत्या.मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले, या संघटनेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे, त्याचा अभिमान असायला हवा, असे सांगून शिवरायांच्या आठ कथानकांच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास अभिनेत्री म्हणून सिनेमातून मांडत असल्याचे त्यांनी सांगितले.सचिन शिरगावकर यांनी स्वागत केले. राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. अल्लम प्रभू यांनी विद्यार्थी परिषदेच्या कामाची माहिती दिली. यावेळी प्रा. विसपुते आणि ललित गांधी यांनी विचार मांडले. उद्योजक सुधीर मुतालिक यांनी कौशल्य वापरून नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बना, असे आवाहन केले. दिग्विजय गरड याने आभार मानले. प्रसन्न म्हाकवेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातून एक हजार प्रतिनिधी उपस्थित होते.भाषणाने तरुणाईला जिंकलेनिसर्गासोबतची नाळ तुटली तर बऱ्याच गोष्टी हाताबाहेर जातील असा इशारा देत एव्हरेस्ट वीरांगना कस्तुरी सावेकर हिने एखादे शिखर सर करणे म्हणजे नुसती पायपीट नसावी, तर निसर्गाप्रतीचा आदर आणि जिव्हाळा मनात ठेवून शिखर सर करता आले पाहिजे, असे सांगत आपल्या भाषणाने तरुणाईला जिंकले.
अभाविप माणूस बनवणारी संघटना, अभिनेत्री मृणाल कुलकर्णींने व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 4:18 PM