कसबा बावडा : कसबा बावडा व परिसरात खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे. शेत नांगरणे, तण गोळा करणे, पालापाचोळा पेटवणे, पाटे मारणे, बांध घालणे आदी कामांत येथील शेतकरी गुंतला आहे. बावडा परिसरात एप्रिलच्या अखेरीस दोन व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन असे जोरदार चार वळीव पाऊस झाले. त्यामुळे हा पाऊस खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीच्या नांगरणीसाठी उपयुक्त ठरला. सध्या वळीव पावसामुळे जमिनीला घात आल्याने नांगरणीची कामेही सुलभ होऊ लागली आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने संपूर्ण कुटुंबच शेतात मशागतीच्या कामासाठी राबताना दिसत आहेत.
या महिन्याच्या अखेरीस काही शेतकरी धूळवाफ भाताची पेरणी करणार आहेत तर बहुसंख्य शेतकरी जून महिन्यात पावसाचा अंदाज पाहून पहिल्या आठवड्यात भाताची पेरणी करतील. बावड्यात भातापेक्षा ऊसाचे क्षेत्र जास्त आहे. मात्र, सलग तीन वर्षे ऊसाचे पीक घेतल्यानंतर जमिनीचा कस वाढावा म्हणून काही शेतकऱ्यांचा भाताचे पीक घेण्याकडे कल आहे. एकूण क्षेत्राच्या १० ते १५ टक्के क्षेत्र भातासाठी प्रत्येक वर्षी राखीव असते.
दरम्यान, परिसरात मध्यंतरी झालेल्या चार वळीव पावसांचा ऊस पिकावर चांगलाच परिणाम झाला आहे. वळीव पावसाने ऊसाची उंची वाढली असून, मे महिन्यातही ऊसपिके सर्वत्र हिरवीगार दिसत आहेत.
फोटो :१५ बावडा खरीप हंगाम
कसबा बावडा परिसरात खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे. बावडा - एमआयडीसी रस्त्यावरील एका शेतात टिपलेले छायाचित्र.
(फोटो-रमेश पाटील,कसबा बावडा )