कोल्हापूर : अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात मंडप उभारणीसह महाकाली व सरस्वती मंदिर, गणपती चौकाची स्वच्छता करण्यात आली.देवस्थान समितीतर्फे शहरातील विविध सात ठिकाणी श्री अंबाबाईच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. समितीतर्फे शहरातील सात प्रमुख ठिकाणी आठ बाय दहाचे एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे भक्तांना मंदिरात न येताही देवीचे दर्शन होणार आहे. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाची तयारी अंबाबाईच्या मंदिरात मोठ्या उत्साहात केली जात आहे.
देवस्थान समितीचे सदस्य आणि सर्व कर्मचारी मंदिराची स्वच्छता, दुरुस्ती, रंगकाम अशा कामांमध्ये व्यस्त आहेत. अंबाबाईचे दर्शन सर्व भाविकांना सुलभ आणि व्यवस्थित व्हावे यासाठी समितीकडून योग्य ते नियोजन व व्यवस्थापन केले जात आहे. केवळ मंदिरात येणाऱ्या भक्ताला नाही, तर शहरातील प्रत्येक नागरिकाला देवीची पूजाअर्चा व दर्शन व्हावे यासाठी समितीकडून डिजिटल माध्यमांचाही वापर केला जात आहे. रविवारी दुपारपर्यंत मंदिराच्या पूर्वेकडील सरलष्कर भवनासमोरील मुख्य दर्शनरांगेच्या मंडप उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. या कामासाठी देवस्थानचे कर्मचारी व काही स्वयंसेवकही राबत आहेत.गतवर्षीप्रमाणे शहरातील बिंदू चौक, घाटी दरवाजा,मिरजकर तिकटी, शिवाजी चौक, दर्शन मंडप परिसर, आदी सात ठिकाणी आठ बाय दहा फुटांचे एल.ई.डी. स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. या स्क्रीनद्वारे या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना देवीचे दर्शन घडणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव विजय पवार यांनी दिली.सेवा यंदाहीगेली १६ वर्षे मुंबई येथील संजय मेंटेनन्स कंपनीकडून अंबाबाईला स्वच्छता सेवा अर्पण केली जाते. यंदाही या सेवेस सुरुवात झाली. संजय मेटेनन्सच्या २० कर्मचाऱ्यांनी या कामास सुरुवात केली.सकाळी या कर्मचाऱ्यांनी प्रथम शिखरांसह सरस्वती मंदिर, महाकाली मंदिर, गणपती चौक यांसह अंबाबाई परिसराची पाणी मारून स्वच्छता केली.