कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित ५९ व्या राज्य नाट्यस्पर्धेत सहभागी संस्थांकडून तालमींना वेग आला आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी आता अवघे तीन दिवस राहिल्याने रंगकर्मी दिवसभरातील आपले काम, व्यवसायाचा व्याप सांभाळून रात्री उशिरापर्यंत तालमींवर जोर देत आहेत. दुसरीकडे, पडद्यामागे काम करणारे नेपथ्यकार, रंग-वेशभूषा, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत या पातळ्यांवर जोरदार तयारी सुरू आहे.नवोदित कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ आणि नव्या पिढीतील कलावंत घडविणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेला एक परंपरा लाभली आहेच; शिवाय या स्पर्धेत सहभागी होणे हे हौशी कलावंतांचे स्वप्न असते. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे यंदा ५९वी राज्य नाट्य स्पर्धेची कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरी शुक्रवार (दि. १५)पासून सुरू होत आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात १३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेत यंदा २९ नाटके सादर होणार आहेत. यात कोल्हापूर, सांगलीसह बेळगाव येथूनही संघ सहभागी होणार आहेत.दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेची तारीख दिवाळीनंतर जाहीर होत असली तरी कलावंतांकडून स्क्रिप्टची निवड, कलाकारांची निवड ही प्राथमिक तयारी तीन महिने आधीपासूनच सुरू असते. गणेशोत्सवानंतर जाहीर होणाºया स्पर्धेच्या वेळापत्रकाकडे लक्ष लागून राहते.
स्पर्धा जाहीर झाल्यावर प्रत्यक्ष तालमींना रंग येतो. सध्या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांच्या तालमी रंगू लागल्या आहेत. या स्पर्धेत भाग घेणारे, अभिनयापासून ते इतर तांत्रिक सहकार्य करणारे रंगकर्मी हौशी असतात.
आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून ते या स्पर्धेसाठी आणि तालमींसाठी वेळ देतात. त्यामुळे सायंकाळी सातनंतर सगळे एकत्र जमतात आणि तालीम सुरू होते. त्यासाठी सांस्कृतिक कार्यालये, शाळांचे हॉल, संस्थांचे हॉल, तरुण मंडळांचे हॉल घेण्यात आले आहे. स्पर्धेला आता अवघे तीन दिवस राहिल्याने सध्याच्या तालमीत नेपथ्यासाठी वापरल्या जाणाºया साहित्याचाही समावेश झाला आहे.
आम्ही हलकंफुलकं कौटुंबिक जिव्हाळ्यावर आधारित कौटुंबिक नाटक स्पर्धेत सादर करीत आहोत. संस्थेतील सगळेच कलाकार हौशी आणि तरुण आहेत; त्यामुळे दिवसभर महाविद्यालय, नोकरी, व्यवसाय सांभाळून रात्री नाटकासाठी वेळ दिला जातो. भूमिकेतील कलावंत, नेपथ्य, पार्श्वसगीत, रंगभूषा अशी प्रत्येक जबाबदारी सगळे मिळून पार पाडत आहोत. रात्री आठ ते अकरा वेळेत तालीम चालते.- शेखर बारटक्के (दिग्दर्शक)श्री लक्ष्मी वसाहत विकास तरुण मंडळ