आजरा : पावसाने उघडीप दिल्याने आजरा तालुक्यात भात, सोयाबीन, भुईमूग कोळपणीला वेग आला आहे. बैलांच्या साहाय्याने ३ ते ४ कोळपे जोडून कोळपणी केली जात आहे. चांगला पाऊस व वेळेवर झालेली कोळपणी यामुळे सर्वच पिकांची उगवण चांगली झाली आहे.
चालू वर्षी मे महिन्यात झालेला वळीवाचा पाऊस व जमिनीची झालेली मशागत यामुळे पेरणी प्रति वर्षांपूर्वीच झाली आहे. अनेक शेतक-यांनी रोहिणीचा पेरा करून मोत्याचा तुरा घेण्यासाठी वेळेत पेरणी व टोकणणी केली आहे. सध्या पिकांची उगवण चांगली झाली आहे. लहान असताना त्यामध्ये माणसांकडून बाळ कोळपणी केली आहे. सध्या तालुक्यात सर्वत्र पावसाने उघडीप दिली असून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कोळपणीच्या कामाला वेग आला आहे.
तालुक्यात ५ हजार ३०० हेक्टरवर भाताची पेरणी व टोकणणी झाली आहे. सोयाबीनची ९०० हेक्टर तर भुईमूग ३०० एकरवर टोकणणी झाली आहे. सध्या भात रोपलागण सुरू असून जवळपास ६० टक्के क्षेत्रावर भात रोपलावण पूर्ण झाली आहे.
पावसाने उघडीप दिल्यामुळे एकाच वेळी कोळपणीचे काम सुरू आहे.
मजुरांचा तुटवडा असल्याने बैलांच्या साहाय्याने कोळपणी केली जात आहे. एकाचवेळी तीन ते चार कोळपे जोडून बैलातर्फे कोळपणी करून घेतली जात आहे. बैलांची संख्या कमी असली तरी आहे त्याठिकाणी कमी वेळेत कोळपणीचे काम चांगले होत आहे.
भात पिकाबरोबर सोयाबीन, भुईमूग या पिकांमध्ये बैलांतर्फे कोळपणी सुरु आहे. कोळपणीमुळे पिकांमध्ये हवा खेळती राहून जोमाने वाढ होण्यास मदत होते त्याचबरोबर दिलेल्या खतांचा डोस योग्य प्रमाणात पिकांच्या मुळांना जावून पोहोचतो. तालुक्यात सर्वत्र पावसाच्या उघडीपीमुळे कोळपणीच्या कामाला वेग आला आहे.
कृषी विभागाचे अधिकारी शेतक-यांच्या बांधावर
कृषी संजीवनी योजनेतंर्गत कृषी विभागाचे अधिकारी शेतक-यांच्या बांधावर जात आहेत. पिकांना दिला जाणारा खतांचा डोस व पिकांवर भविष्यकाळात होणारा किडीचा प्रादुर्भाव याची माहिती दिली जात आहे. सद्यस्थितीत तालुक्यात कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव नाही. मात्र, उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
फोटो ओळी : आर्दाळ (ता. आजरा) येथे टोकणणी केलेल्या भातात बैलांच्या साहाय्याने सुरू असलेली कोळपणी.
क्रमांक : २७०६२०२१-गड-०७