आजरा : ग्रामपंचायत सदस्यांना पॅनल बंदी कायदा करावा, पंधराव्या वित्त आयोगाचा निधीसाठी पूर्वीप्रमाणे चेकने पेमेंट करण्याची परवानगी द्यावी, सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात वाढ करावी, पंधरा लाख रुपयांपर्यंतची कामे ग्रामस्तरावर करण्याची परवानगी द्यावी, नवी मुंबई येथे सरपंच भवन उभारण्यात यावे, अशा अनेक मागण्या करूनही राज्य सरकारकडून त्या सोडविल्या जात नाहीत. सरपंच परिषदेने केलेल्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा सोमवार (दि. ८) मार्चपासून मुंबईत ठिय्या आदोलन करण्याचा इशारा सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, विरोधी पक्षनेते व प्रधान सचिवांना दिले आहे.
निवेदनावर, प्रदेशाध्यक्ष दत्ताजी काकडे, उपाध्यक्ष अनिल गीते, महिला अध्यक्षा राणी पाटील, सरचिटणीस अॅड. विकास पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम पोतनीस यांची स्वाक्षरी आहे.