कोल्हापूर : पुणे पासपोर्ट कार्यालयातर्फे पासपोर्ट कॅम्पला येथील विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आज, शनिवारी दीडशे नागरिकांच्या कागदपत्रांच्या छाननीदरम्यान बायोमेट्रिक पद्धतीने हातांचे ठसे व छायाचित्रे काढण्यात आली. ही प्रक्रिया उद्या, रविवारीही सुरू राहणार आहे. कोल्हापुरातील नागरिकांना पासपोर्टसाठी पुण्याला हेलपाटे मारावे लागतात. हा त्रास कमी व्हावा, यासाठी कोल्हापूरकरांची पासपोर्टबाबतची असलेली मागणी आणि त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पाठपुरावा करून या कॅम्पचे आयोजन केले. पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाकडून २२ व २३ आॅक्टोबरला आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया राबविली होती. यात नोंदणी केलेल्यांपैकी पहिल्या टप्प्यात ३०० जणांच्या कागदपत्रांच्या छाननीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दीडशे इच्छुकांच्या कागदपत्रांची तपासणी केली. या प्रक्रियेत हातांच्या बोटांचे ठसे आणि छायाचित्र तसेच अपूर्ण माहिती पूर्ण करून घेण्यात आली. (प्रतिनिधी)
पासपोर्ट प्रक्रियेतील पोलीस व्हेरिफिकेशनही होणार सुलभ
By admin | Published: November 02, 2014 12:34 AM