बोलकेवाडी (ता. आजरा) येथील उत्तम मारुती कातकर यांच्या पाच म्हैशींचा अपघाती मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने शवविच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी कोल्हापूरला पाठवला आहे. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, कातकर यांचे अंदाजे ६ लाखांचे नुकसान झाले आहे.
उत्तम काटकर यांचा तांबाळ नावाच्या शेतात जनावरांचा गोठा आहे. या ठिकाणी सहा म्हैशी व दोन लहान रेडकू आहेत. सकाळी दूध काढून वैरण घालून कातकर घरी आले होते. त्यानंतर ११.३० वाजता सुमारास मुलगा किशोर जनावरांना पशुखाद्य घालण्यासाठी गेला असता त्यांच्या ही घटना लक्षात आली.
चार म्हैशी व एक रेडा मृतावस्थेत पडलेला आढळून आला. तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम ढेकळे, डॉ. जालकर व 'गोकुळ'च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हैशींचे शवविच्छेदन करून व्हिसेरा काढून ठेवला आहे. उद्या कोल्हापूरला तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी 'गोकुळ'च्या संचालिका अंजना रेडेकर यांनी भेट दिली.
-----------------------
फोटो ओळी : बोलकेवाडी (ता. आजरा) येथील उत्तम कातकर यांच्या गोठ्यात मृतावस्थेत पडलेल्या म्हैशी.
क्रमांक : १५०७२०२१-गड-११