उद्धव गोडसेकोल्हापूर : गेल्या आठ-दहा वर्षांपासून अपघाती मृत्यूंची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच आत्महत्या आणि अल्पवयीन मुली घर सोडून पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १,२०७ अपघाती मृत्यू झाले. ७६७ मुली घर सोडून पळाल्या, तर ४ हजार ७६७ जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या तिन्ही समस्या गंभीर बनत आहेत. त्यामुळे हे रोखण्याचे आव्हान समाजासह सर्वच शासकीय यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे.
तीन वर्षांत १,२०७ अपघाती मृत्यूवाहतूक गतिमान आणि सुरक्षित व्हावी, यासाठी रस्ते प्रशस्त केले जात आहेत. मात्र, रस्ते कामातील त्रुटी आणि वाहनधारकांच्या बेशिस्तीमुळे सुरक्षेचा मुद्दा बाजूला पडल्याचे दिसत आहे. किरकोळ आणि गंभीर अशा सर्वच प्रकारच्या अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यातून दरवर्षी हजारो लोकांना अपंगत्व येते. तीन वर्षात १,२०७ जणांनी आपले प्राण गमावल्याने सबंधितांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले.विशेष म्हणजे अनेक वाहनधारक विमा संरक्षण घेत नाहीत. त्यामुळे अपघातानंतर मृतांच्या नातेवाइकांना योग्य नुकसानभरपाई मिळत नाही. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांची परवड होते. हे टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांनी ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांची संख्या कमी होऊ शकते.आत्महत्येची समस्या गंभीरशालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत विविध वयोगटातील व्यक्ती क्षुल्लक कारणातून आत्महत्या करीत जगणे संपवत आहेत. विशेष म्हणजे यात तरुणांची संख्या लक्षणीय असल्याने चिंता वाढली आहे. अपयश, बेरोजगारी, आर्थिक चणचण, वाढते मानसिक ताणतणाव, कौटुंबीक वादातून आत्महत्या होत आहेत. आजाराला कंटाळून आत्महत्या करण्याचेही प्रमाण वाढत आहे.ही समस्या अतिशय गंभीर असूनही काही अपवाद वगळता पोलिस दप्तरी याची नोंद आकस्मिक मृत्यू अशी होते. त्यामुळे आत्महत्यांची नेमकी आकडेवारी समोर येत नाही. गळफास, बुडून मयत, तणनाशक प्राशन केल्यानंतर होणारे मृत्यू, पेटवून घेतल्यानंतर होणाऱ्या मृत्यूंच्या नोंदी आत्महत्या म्हणूनच होणे आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षात आकस्मिक मृत्यू आणि आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ४ हजार ७६७ एवढी आहे.
७६७ अल्पवयीन मुली पळाल्यागेल्यी तीन वर्षात जिल्ह्यातून ७६७ अल्पवयीन मुली पळाल्या. यातील ७१५ मुली सापडल्या असून, ५२ मुलींचा शोध सुरूच आहे. सोशल मीडियाचा गैरवापर, शारीरिक आकर्षण, प्रेमाचे आमिष, कुटुंबातील हरवलेला संवाद आणि स्वातंत्र्याचा गैरफायदा घेण्याच्या वृत्तीमुळे अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.ही समस्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम करते. समाजातील बदनामीमुळे कुटुंबाला मानसिक धक्का बसतो. घरातील इतर मुलींचे लग्न होण्यास अडचणी येतात. मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सुटते. कुटुंबात विसंवाद वाढतो. मुलगा आणि मुलीच्या कुटुंबात वाद होतात. या समस्येवर वेळीच उपाय करण्याची गरज आहे, अन्यथा याचे परिणाम आणखी गंभीर होण्याचा धोका आहे.हे आकडे चिंताजनक
प्रकार - २०२४ - २०२३ - २०२२ - एकूण
- आत्महत्या - १,६१० - १,५१३ - १,६४४ - ४,७६७
- अपघात - ३६३ - ४१२ - ४३२ - १,२०७
- मुली पळून जाणे - २६७ - २४० - २६० - ७६७