कोल्हापूर : गेले १४ महिने कोरोनाच्या जिल्ह्यातील आकडेवारीचे संकलन करणाऱ्या साथ रोग विभागाला जुन्याच संगणकावर काम करावे लागत असल्याची बातमी मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. याची तातडीने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी कार्यालय सोडण्याआधी संध्याकाळी दोन नवे संगणक आणि नवे प्रिंटर या विभागाला दिले.
कोरोनाच्या साथीला सुरुवात झाल्यापासून साथ रोग कक्षाच्यावतीने या सर्व आकडेवारीचे संकलन करण्यात येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आकडेवारीपासून मृत्यूपर्यंतचे विश्लेषण, केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत पाठविण्यात येणारी आकडेवारी याच कक्षाकडून संकलित केली जाते. मात्र, आठ, दहा वर्षांच्या जुन्या संगणकावर या कक्षातील कामकाज सुरू होते. ‘लोकमत’मध्ये मंगळवारी बातमी प्रसिद्ध झाली. जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी याबाबत सर्वसाधारण सभेत प्रश्नही उपस्थित केला. तेव्हा चव्हाण यांनी आजच संगणक देणार असल्याचे स्पष्ट केले होते.
सर्वसाधारण सभेनंतर चव्हाण यांनी दोन नवे संगणक आणि प्रिंटर उपलब्ध करून संध्याकाळी जाण्याआधी ते प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांच्याकडे सुपुर्द केले.