* लोकमत फॉलोअप्
गडहिंग्लज :
भूमिअभिलेख कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे दाखल झालेल्या ‘बनावट कजाप’प्रकरणाची रितसर चौकशी मंगळवारपासून सुरू झाली. पुढील सुनावणी बुधवारी (दि. १६) नेमण्यात आली आहे, अशी माहिती भूमिअभिलेख उपअधीक्षक सिद्धेश्वर घुले यांनी दिली.
याप्रकरणी भूमिअभिलेख उपअधीक्षकांच्या बनावट सही व शिक्क्याचा वापर झाला आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार ही चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी गडहिंग्लज शहरातील सर्व्हे नंबर ४५/२ पैकी ०.९७ गुंठे या बिगरशेती जमिनीच्या खातेदारांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. परंतु, नेसरी-कोवाड मार्गावरील तारेवाडी गावच्या हद्दीतील गट नंबर १०१ मधील १ हेक्टर ४४ गुंठे या जमिनीच्या खातेदाराचे निधन झाल्यामुळे त्यांची नोटीस परत आली आहे. त्यामुळे त्यांच्या वारसांना नोटीस बजावणार आहे.
दरम्यान, ‘त्या’ बिगरशेती जमिनीच्या गुंठेवारी/अभिन्यास (ले-आऊट) मंजुरीसंदर्भात तहसीलदार, प्रांताधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा अभिप्रायदेखील मागविण्यात आला आहे. परंतु, ते अद्याप प्राप्त झालेले नाहीत, असेही घुले यांनी सांगितले.