कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या शेतजमीन गैरव्यवहारप्रकरणी शिवाजी पेठेतील समितीच्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना सचिव शुभांगी साठे यांनी नोटिसा पाठवून त्यांची एका विशेष पथकाद्वारे चौकशी सुरू केली आहे. काही समिती सदस्यांनाही चौकशीसाठी नोटिसा पाठविल्या आहेत. देवस्थान समिती आणि पोलिसांच्या चौकशीचा फास आपल्याभोवती आवळत असल्याने सदस्यांसह कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची शाहूवाडीत साडेचार हजार एकर शेतजमीन आहे. ‘सीआयडी’च्या भूखंड गैरव्यवहार चौकशीमध्ये शाहूवाडीतील उदगिरी येथील एक हजार एकर शेतजमीन देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांच्या समितीच्या लेटरपॅडवर बोगस सह्या व शिक्के मारून मुंबई व पेठवडगाव येथील दोन कंपन्यांच्या नावे चढविण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाला ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी समितीच्या कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश सचिव साठे यांना दिले. त्यानुसार त्यांनी महसूल खात्यातीलच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त करून कर्मचाऱ्यांची चौकशी लावली आहे. या गैरव्यवहारात कार्यालयातील वरिष्ठ लिपिकांसह कर्मचारी, तलाठी संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांच्यासह समिती सदस्यांना नोटिसा पाठवून चौकशी सुरू केली आहे. या गैरव्यवहारात काही राजकीय हस्तकांचा समावेश असल्याने त्यांनी आपले नाव पुढे येऊ नये यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. (प्रतिनिधी) देवस्थान शेतजमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठे रॅकेट आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या सह्या सहा पानांवर घ्याव्या लागतात. सदस्य, कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. तपास अधिकारी दयानंद मोरे हे सोलापूरला प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे सह्णांचे नमुने सोमवारी पाठवू शकलो नाही. लवकरच कागदोपत्री तपास पूर्ण करून सह्णांचे नमुने हस्ताक्षरतज्ज्ञांकडे पाठविले जातील. कोणताही राजकीय दबाव न घेता आम्ही तपास करीत आहोत. दोषी आढळणाऱ्यांना अटक केली जाईल, मग तो किती मोठा आहे हे पाहिले जाणार नाही. अनिल देशमुख, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे,
खातेनिहाय चौकशीचे आदेश
By admin | Published: July 26, 2016 12:45 AM