राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ग्रामीण भागात खासगी सावकारांचे अक्षरश: पेव फुटले आहे. विशेष म्हणजे मोठ्या गावात ही संख्या जास्त असून, गि-हाईक भेटेल तशी व्याजाची वसुली केली जाते. दरमहा ३ पासून १० टक्क्यांपर्यंत व्याजदराने आगाऊ रक्कम कपात करूनच पैसे दिले जातात. मासिक १० टक्के आकारणी म्हणजे वर्षाला दामदुप्पट होते, त्याची परतफेड करणे कोणालाही अशक्यच होते. त्याचबरोबर भिशीच्या माध्यमातून मोठे रॅकेट गावागावांत सक्रिय झाले असून, त्यातही अडले-नडले बळी पडल्याचे वास्तव समोर येत आहे.
बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांवर गुरुवारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापे टाकले; त्यामुळे सावकारांचे धाबे दणाणले असून, या कारवाईनंतर सावकारकीच्या व्याजाला बळी पडलेले अनेकजण पुढे येत आहेत. आपली गरज काढल्याने फारसे कोणी तक्रारीसाठी पुढे येत नसले, तरी तोंड बंद करून मुक्याचा मार मात्र ते सहन करत आहेत. घरात अचानक आजारी पडले, मुलीचे लग्न आहे, यांसह इतर कारणांसाठी सामान्य माणूस सावकारांच्या दारात जातो.
याच अडचणीचा बरोबर फायदा उठवून मनमानी व्याज आकारणी केली जाते. समोरच्या गिºहाइकाची गरज व त्याला तातडीने पैसे हवे असतील, तर जादा व्याजदर आकारला जातो. सर्वसाधारणपणे ३ टक्क्याने हे सावकार पैशांची फिरवाफिरवी करत असले, तरी सर्रास ५ व १० टक्क्यांनी वसुली केली जाते. पैसे देताना जी रक्कम द्यायची, त्याचे महिन्याचे व्याज अगोदरच वसूल करूनच उर्वरित रक्कम त्याच्या हातात दिली जाते. त्यानंतर महिन्याच्या महिन्याला व्याज वसुली सुरू होते.
केवळ खासगी सावकारच या व्यवसायात गुंतले असे नाहीत तर ‘भिशी’च्या गोड नावाखालीही ग्रामीण भागात सावकारकी जोरात सुरू आहे. ‘भिशी’ चालविणारे मालामाल झाले असून, त्यांचा दरही ३ ते ५ टक्क्यापर्यंत असतो. ठेवीला व्याजदर चांगला मिळत असल्याने बॅँकेपेक्षा भिशीतच पैसे गुंतविणारे अनेकजण आहेत; त्यामुळे गावातील पतसंस्था, बॅँकांकडे जेवढ्या ठेवी नाहीत, त्यापेक्षा कितीतरी पटीने भिशीत ठेवी जमा होतात. तेच पैसे जादा व्याजाने फिरवून भिशीचालक मालामाल झाले आहेत. भिशी चालकांवर कारवाई करण्याचे अधिकार सहकार विभागाला नसले, तरी ते पोलिसांच्या रडारवर आहेत.
वसुलीचा रेटा लावला की तक्रार
- बेकायदेशीर खासगी सावकारीमध्ये केवळ पैसे देणाराच दोषी असतो असे नाही, तर काही प्रमाणात घेणारेही आहेत.
- काहीजण तीन-चार लोकांकडून पैसे घेतात आणि वसुलीचा रेटा लावला की सहकार विभागाकडे तक्रार करायची, अशी प्रवृत्ती बोकाळत आहे.
- दुर्गम वाड्यावस्त्यांपर्यंत मजल
- मोठ्या व लहान गावांत हा व्यवसाय जोमात सुरू आहेच. त्याचबरोबर दुर्गम वाड्यावस्त्यांवरही आपले ‘सावज’ शोधण्यासाठी यंत्रणा लावली आहे.
- दर आठवड्याला त्या वाडीत भेट द्यायची, चौकातील पारावर बसले, की ठरल्याप्रमाणे व्याज घेऊन ती व्यक्ती तिथे येते.
शहरातील ‘दादां’चे ग्रामीण भागात एजंटकोल्हापूर शहरातील बड्या सावकारांच्या नावाखाली ग्रामीण भागात खासगी सावकारकी फोफावली आहे. विशेष म्हणजे न काय करता रकमेची फिरवाफिरवी करून चांगले पैसे मिळत असल्याने अनेक तरुण यामध्ये गुंतल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.