कोल्हापूर : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मारामारी, दमदाटी, खंडणी उकळणे अशा गंभीर गुन्ह्यातील दम मारो दम टोळीला पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. शाहूपुरी पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाची चौकशी जयसिंगपूरचे उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी केली. अल्पवयीन वयातच गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय झालेल्या गुंडांचा या टोळीत सहभाग आहे.
टोळीचा म्होरक्या नकुल राजू जाधव (वय २३), देवेंद्र काळू जोंधळे (१९, दोघे रा. माकडवाला वसाहत, कोल्हापूर), फिरोज ऊर्फ साजिद अल्लाबक्ष शेख (२३, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), रियाज अन्वर सय्यद (२०), आदर्श ऊर्फ पिल्या संजय गायकवाड (१९), पीयूष शंकर पवार (१८, तिघे रा. विचारे माळ, कोल्हापूर), सौरभ काळू कोळी (२१, रा. सदर बाजार, कोल्हापूर) अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
नकुल जाधव याने दम मारो दम टोळी तयार करून गेल्या चार-पाच वर्षांपासून सदर बाजार आणि विचारे माळ परिसरात दहशत निर्माण केली होती. या टोळीत काही अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. पोलिसांनी अनेकदा त्यांना पकडून समज दिली. मात्र, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढच झाली. अखेर शाहूपुरी पोलिसांनी या टोळीच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सादर केला. उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी प्रस्तावाची चौकशी केली. टोळीतील गुन्हेगारांना पोलिस अधीक्षकांसमोर त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर सदर बाजार परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेऊन अधीक्षक बलकवडे यांनी बुधवारी (दि. १९) या टोळीला एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी तातडीने हद्दपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करून टोळीला जिल्ह्याबाहेर सोडले.