कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील ‘एव्हीएच’ प्रकल्पाकडून उत्पादन सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाच्या संरक्षणाचे काम करणाऱ्या ‘निरी’ संस्थेचे संचालक, प्रदूषण नियंत्रणचे अधिकारी यांनाच मॅनेज केले आहे, असा आरोप एव्हीएच विरोधी कृती समितीच्या नेत्या डॉ. नंदा बाभूळकर यांनी सोमवारी केला. ‘निरी’चे संचालक, एव्हीएच व प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांच्यातील तडजोडीच्या संभाषणाची ‘आॅडिओ’ही यावेळी उघड केली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे नेते बी. एन. पाटील-मुगळीकर, शिवप्रसाद तेली, सतीश पाटील, आदी उपस्थित होते. डॉ. बाभूळकर म्हणाल्या, एव्हीएच केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प प्रदूषणकारी आहे. प्रदूषणाने पश्चिम घाटातील निसर्ग, जैववैविधता व परिसरातील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. यामुळेच गेल्या दीड वर्षापासून एव्हीएच विरोधी जनआंदोलन सुरू केले. आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने प्रकल्पाची जाळपोळ झाली. त्यानंतर त्वरित मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या उत्पादनास बंदी घातली. कंपनीच्या चुकीच्या परवान्याच्या चौकशीसाठी ९ जून २०१५ रोजी शासनाने राज्यस्तरीय समिती नियुक्त केली. या समितीमध्ये मी स्वत:, गजानन देवाण, ‘निरी’कडून डॉ. तपसी नंदी, प्रदूषण नियंत्रण समितीचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या समितीच्या कोल्हापुरात दोन बैठका झाल्या. आम्ही बैठकीत प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणासंबंधीचे मुद्दे उपस्थित केले. कोल्हापूरच्या बैठकीस समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त चोकलिंगम उपस्थित होते. शेवटची बैठक २९ जानेवारीला नागपूरमध्ये झाली. या बैठकीस माझ्यासह गजानन देवाण, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पी. के. मिराशी, एव्हीएच कपंनीचे मोहिंदर सिंघना, ‘निरी’चे संचालक डॉ. नंदी उपस्थित होते. बैठक ११ वाजता सुरू झाली. दुपारी काहीवेळ जेवणासाठी बैठक स्थगित झाली. मी व देवाण बाहेर पडलो. त्या कालावधीत कंपनीचे अधिकारी सिंघना, मिराशी, डॉ. नंदी यांच्यात प्रकल्पातील उत्पादन सुरू करण्यासंबंधी चर्चा झाली. ती चर्चा एव्हीएच कंपनीला मदत करणारी होती. आमच्या एका प्रतिनिधीने तेथे बसून चर्चेचे रेकॉर्डिंग केले. ते ऐकल्यानंतर एव्हीएच कंपनीने सर्वांना मॅनेज केले आहे, असे निदर्शनास आले. प्रकल्पास विरोध कायम आहे. त्यामुळे कंपनीचे साहित्य काढून स्थलांतर सुरू आहे. कर्नाटकात हा प्रकल्प हलविण्यात येणार आहे. मुंबईच्या एक्सेस बँकेच्या कर्जापोटी एव्हीएच प्रकल्प तारण दिला आहे. त्यामुळे नागपूरच्या बैठकीचा संदर्भ देऊन बँकेची दिशाभूल करण्यासाठी उत्पादन सुरू करणार असल्याच्या बातम्या कंपनीकडून वृत्तपत्रांना पुरवण्यात आल्या आहेत. त्या पूर्णपणे खोट्या आहेत. त्यामुळे आता त्वरित जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पस्थळास भेट देऊन चर्चा करावी. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, एव्हीएच प्रकल्प हटवण्यासाठी यापूर्वी लोकसभेत प्रश्न विचारले होते. आता प्रकल्प सुरू करण्यासंबंधीच्या प्रकरणात गैरमार्गाने सहभागी झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. त्यांची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी अधिवेशनात करणार आहे.
‘एव्हीएच’कडून प्रदूषण मंडळासह निरी ‘मॅनेज’
By admin | Published: February 02, 2016 1:05 AM