कोल्हापूर : मुंबई येथे झालेल्या आर. वाय. पी. निमंत्रित स्पोर्टस मिट शूटिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या ‘वेध रायफल व पिस्टल शूटिंग अकॅडमी’च्या नेमबाजांनी आठ सुवर्ण, चार रौप्य व सात कांस्य पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत विराज पाटील याने १० मीटर एअर रायफल पीपसाईटमध्ये वरिष्ठ, कनिष्ठ व यूथ गटात तीन सुवर्णपदके पटकाविली. त्याला उत्कृष्ट नेमबाजाचा किताब बहाल करण्यात आला. त्याने भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय नेमबाजी स्पर्धेतही एक सुवर्ण व कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्याची ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे, तर याच प्रकारात रणवीर काटकर याने वरिष्ठ, कनिष्ठ आणि युथमध्ये प्रत्येकी एक रौप्य पदकाची कमाई केली.
अभिषेक व्हरांबळे यानेही याच गटात तीन कांस्य पदकांची कमाई केली. १0 मीटर एअर पिस्तल प्रकारात अक्षय कामत याने वरिष्ठ गटात कांस्य, कनिष्ठ व यूथ गटात प्रत्येकी एक सुवर्णपदकाची कमाई केली. ओपन साईट रायफल प्रकारात ऋषिकेश मेटिल याने तिन्ही गटात प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकाविले. भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय नेमबाजी स्पर्धेत १0 मीटर एअर रायफल प्रकारात आदित्य साळोखे यानेही तिन्ही प्रकारांत प्रत्येकी एक कांस्य पदकाची कमाई केली. अभिषेक बजागे याने रौप्य पदक पटकाविले. या नेमबाजांना आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले-हवालदार, रोहीत हवालदार यांचे मार्गदर्शन, तर जिल्हा रायफल असोसिएशन व आहारतज्ज्ञ सुप्रिया बोरचाटे यांचे प्रोत्साहन लाभले.