ज्योतीप्रसाद सावंत ---आजरा ग्रामपंचायतीसह तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका समोर असताना तालुक्यातील शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. एकमेकांविरोधात केली जाणारी विधाने, अपमानास्पद बोलणे, शह-काटशहाचे राजकारण यामुळे शिवसेना निश्चितच बॅकफुटवर जात आहे.स्व. दिलीप देऊसरकर यांनी शिवसेनेची आजरा तालुक्यात उभारणी केली. आजरा तालुक्यातील मुंबईस्थित चाकरमान्यांनी शिवसेनेला नेहमीच साथ दिली. केदारी रेडेकर यांच्यासह अनेकांचे योगदान असणाऱ्या शिवसेनेला आजरा ग्रामपंचायत, तालुका संघ, आजरा साखर कारखान्यात बस्तान बसविता आले. त्यासोबत आजरा शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागाचे नेतृत्व करण्याची संधी शिवसेनेला आमदार प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने मिळाली.हे सर्व करत असताना शिवसेनेला वेळोवेळी इतर पक्ष, गट यांची मदत घ्यावी लागली आणि ही मदतच सेनेच्या वाटचालीतील मोठा अडथळा ठरू लागली. ज्यांची ज्यांची सत्तेने मदत घेतली त्यांच्याशीच अनेक शिवसैनिकांनी साटेलोटे केले. यातील बऱ्यापैकी कार्यकर्ते मनसे, काँगे्रस असा प्रवास करून स्वगृही परतले, तर काहींनी शिवसेनेशी कायमची फारकत घेतली.पक्षापेक्षाही व्यक्तीकेंद्रित राजकारणाला प्राधान्य दिले गेल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी तालुका शिवसेनेला कधी मिळाली नाही, तर ग्रामपंचायत व तालुका संघातूनही बाहेर व्हावे लागले. स्थानिक आमदार शिवसेनेचे असले तरी अनेक प्रमुख मंडळी गटबाजीमुळे त्यांच्यापासून दूरच राहताना दिसतात. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर माजी सभापती व आजरा साखर कारखाना अध्यक्ष विष्णूपंत केसरकर यांनी सेनेत प्रवेश केला. या निवडणुकीत केसरकर यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांनी सोयीच्या भूमिका घेतल्याने केसरकर यांच्या पदरात पश्चात्ताप पडला. त्यानंतर आजतागायत केसरकर सेनेपासून सुरक्षित अंतरावर आहेत. केसरकरांचाच अनुभव पं. स. उमेदवार देवराज माडभगत व ओंकार माद्याळकर यांनाही आला आहे.सद्य:स्थितीत आजरा ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे विजय थोरवत प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी ‘शिवसेने’चे लेबल न वापरता अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे, तर कारखान्यात प्रतिनिधित्व करणारे शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत हे महाआघाडीतून निवडून आले आहेत. प्रा. सुनील श्ािंत्रे हे राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसच्या आघाडीतून निवडून आले आहेत. आजरा ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. पुन्हा एकवेळ हा संघर्ष सुरू झाला आहे.आमदार आबिटकर समर्थक शिवसैनिक अशोक चराटी यांच्या आघाडीसोबत राहण्याची शक्यता दिसू लागली आहे. इतर मंडळी राष्ट्रवादी व काँगे्रससोबत जाण्याची चिन्हे आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून आजरा तालुक्यात शेकडोंनी सामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसैनिकांची संख्या घटून आता आंदोलकांची संख्या ओढून ताणून पन्नास-साठ शिवसैनिकांवर आली आहे. ही शिवसेनेची प्रगती की अधोगती? याचा विचार पक्षनेतृत्वानेच करण्याची गरज आहे.
आजऱ्यातील शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण
By admin | Published: May 04, 2017 10:16 PM