कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे २,३०३ वाहनांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यातील अनावश्यक वाहन घेऊन फिरणाऱ्यांची १६२ वाहने जप्त केली तर उर्वरित वाहनांवर गुन्हे नोंदवून सुमारे २ लाख ६० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने कोरोनाचे निर्बंध न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहेत. गेल्या चोवीस तासात विनामास्क फिरणाऱ्या ३६० व्यक्तींवर कारवाई करुन त्यांच्याकडून ७९ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. तर अवैद्य दारु व्यवसाय करणाऱ्या १६ आरोपींवर कारवाई करत १४ गन्हे दाखल केले. या कारवाईत सुमारे ४ लाख २३ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, दिवसभरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील जुना राजवाडा पोलीस ठाणे-७ गुन्हे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे-२, शाहुपूरी पोलीस ठाणे-५, कागल पोलीस ठाणे-१, गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे-३, शिरोळ पोलीस ठाणे-१ असे एकूण १९ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.