कोल्हापूर : कडक लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण दोन लाख ५४ हजारांचा दंड वसूल केला; तर समारे २३३ वाहने जप्त केली. मॉर्निंग वॉक करणाऱ्या ११९ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून सुमारे ५३ हजार रुपये दंड वसूल केला.
जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला प्रारंभ झाला आहे, त्यामुळे रस्त्यांवर नाहक फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. रविवारी पहिल्या दिवशीच सुमारे ११६३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांपैकी सुमारे २३३ दुचाकी जप्त करण्यात आल्या; तर ९०७ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाख १५ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. त्याशिवाय २३ जणांवर गुन्हे नोंदविले.
प्रशासनाने प्रतिबंध केले असले तरीही त्याला न जुमानता काहीजण रविवारी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. अशांना ताब्यात घेऊन त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनामास्क फिरणाऱ्या २० जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५३ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या प्रशासनाच्या सूचना असतानाही त्या नियमांचे उल्लंघन करून आस्थापना सुरू ठेवल्याप्रकरणी १८ जणांवर कारवाई करीत ३३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.