लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण मोटारसायकलींवरून व विनामास्क फिरणाऱ्या अशा एकूण १६२ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ४३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई शिवाजीनगर, गावभाग व शहर वाहतूक शाखेने केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामध्ये गावभाग पोलिसांनी मोटारसायकलवरून फिरणाऱ्या ४५ जणांकडून नऊ हजार ७०० रुपये दंड व विनामास्क बारा जणांकडून ५०० रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये दंड वसूल केला. तसेच शिवाजीनगर पोलिसांनी मोटारसायकलीवरून फिरणाऱ्या ३१ जणांकडून सहा हजार २०० रुपये व शहर वाहतूक शाखेने ७४ मोटारसायकलींवर कारवाई करून २१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याअनुषंगाने शहरात विविध पोलीस ठाण्यांतर्गत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.