कोल्हापूर : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दोन दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यात ४० वाहने ताब्यात घेण्यात आली. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर योग्य ती कारवाई करून ती वाहनमालकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत.वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने शनिवारी (दि. १२) व रविवारी वाहने तपासण्यात आली. यात वाहनधारकांकडे वाहनांचा विमा मुदत, वाहनाची कागदपत्रे, पीयूसी, आदींची मागणी करण्यात आली. यात कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांची वाहने ताब्यात घेण्यात आली.
ही वाहने कागदपत्रांची पूर्तता व दंडात्मक कारवाई करून वाहनमालकांना परत केली जाणार आहेत. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांच्या मार्गदर्शनाखाली मोटारवाहन निरीक्षक ए. के. पाटील, मंगेश गुरव, राकेश दळवी यांनी केली.