कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘वीकेंड लॉकडाऊन’मध्ये शनिवारी दिवसभरात सुमारे शहरात विनाकारण फिरणाऱ्या ७३७ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये शहर वाहतूक शाखेने सुमारे ५८४ वाहनांवर कारवाई केल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी शनिवारी दिली.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शनिवारी व रविवारी प्रशासनाने वीकेंड लॉकडाऊन पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहर व उपनगरांत दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याने नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य राहिले. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी यापूर्वीच दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिवसभरात संपूर्ण शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना चौका-चौकांत अडवून ७३७ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये शहरातील चार पोलीस ठाण्यांअंतर्गत केलेल्या कारवाईत १५३ वाहनांवर ३५ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्यांनाही पोलीस कारवाईचा फटका बसला. दिवसभरात तब्बल ११२ विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत सुमारे ५६ हजार रुपये दंड वसूल केला. याशिवाय महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार आठजणांवर कारवाई करण्यात आली.
शहरात शनिवारी केलेली कारवाई
कारवाई : राजारामपुरी पो. ठाणे - शाहूपुरी - लक्ष्मीपुरी- राजवाडा -शहर वाहतूक शाखा
विनामास्क : १६ - ४८ - १० - ३१ - ७
वाहतूक : १४ - ४८ - ३९ - ५२ - ५८४
दारूबंदी : ०३ -०० - ०१ - ०४ - ००