कोल्हापूर : कदमवाडी, झूम प्रकल्पाशेजारी अवैधरीत्या वाळूची वाहतूक करून ती पाण्याने स्वच्छ करताना रविवारी जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांनी कारवाई केली. मालासह दोन्ही ट्रक महसूल विभागाने आपल्या ताब्यात घेतले असून, सुमारे तीन लाखांचा दंड अपेक्षित आहे.विनापरवाना, विनाचलनची वाळू वाहतूक सुरू आहे. चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करून ती स्वच्छ करून त्याची विक्री केली जाते, असा सुगावा जिल्हा खनिकर्म विभागाला लागला होता. त्यानुसार रविवारी सकाळी कदमवाडी येथील झूम प्रकल्पाच्या परिसरात एका खासगी जागेत दोन ट्रकमधील वाळू धूतली जात होती.
जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांनी त्यांना पकडले. कसबा बावडा तलाठी आर. डी. कोरे यांनी दोन्ही ट्रकचा पंचनामा करून ताब्यात घेतले. या मोहिमेत त्यांच्यासोबत करवीर तलाठी प्रल्हाद यादव, अस्लम शेख, सर्जेराव काळे, आदी सहभागी झाले होते. दोन्ही ट्रक संभाजीनगर येथील माने यांच्या मालकीचे असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती तलाठी आर. डी. कोरे यांनी दिली.