कोल्हापूर : ग्रामीण भागातील परवाना असताना शहरात प्रवेश करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांनी हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर उद्या, शुक्रवारपासून दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. यात पहिल्या टप्प्यात समज आणि दुसऱ्या टप्प्यात थेट दंडात्मक कारवाई होणार आहे.शहरातील प्रमुख मार्गावर रोज वाहतूक कोंडी होत आहे. यात शहरातील दुचाकी, चारचाकी, तीन आसनी रिक्षा यांच्यासह ग्रामीण परवानाधारक रिक्षांचीही भर आहे. विशेष म्हणजे ग्रामीणमध्ये व्यवसाय करण्याचा परवाना असताना हे रिक्षाचालक शहराच्या हद्दीत व्यवसाय करीत आहेत.
अशा रिक्षांना शहरात व्यवसाय करावयाचा असेल तर त्यांनी मीटरप्रमाणे करावा, न त्यापेक्षा ठरवून दिलेल्या हद्दीत व्यवसाय करावा. यात सायबर चौक मागील बाजू, टेंबलाई मंदिर मागील बाजू, ताराराणी पुतळा चौक, फुलेवाडी, नवीन वाशी नाका, साई मंदिर कळंबा अशा ठरवून दिलेल्या ठिकाणीच या रिक्षाचालकांना व्यवसाय करता येणार आहे.
जे रिक्षाचालक हद्दीचा भंग करतील त्यांच्यावर आज, गुरुवारपासून समज आणि उद्या, शुक्रवारपासून थेट कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. याबाबत विविध रिक्षाचालक संघटनांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांची रिक्षाचालकांसह भेट घेतली. त्यावेळी रिक्षाचालकांना नेमून दिलेल्या हद्दीत व नियमांची पूर्तता करून व्यवसाय करण्याची सूूचना पोलीस निरीक्षक बाबर यांनी दिली.