कोल्हापूर : संचारबंदीमुळे पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी केली आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाची कागदपत्रे तपासली जात आहेत. शुक्रवारी दुपारी अशाच एका चारचाकी चालकास कागदपत्रे तपासण्यासाठी थांबविले असता त्याने चकवा दिला. चकवा देऊन पसार झालेल्या त्या चारचाकी चालकावर जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या अंमलबजावणीचे काम पोलीस कर्मचारी करीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी संभाजीनगरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या दरम्यान हाॅकी स्टेडियममार्गे एक चारचाकी आली. त्यातील चालकास थांबवून त्याचा परवाना व कागदपत्रांची मागणी केली. दरम्यान, त्याच्या पाठीमागून आलेली वाहने पोलीस थांबवू लागले. त्याचा फायदा घेत हा चारचाकी चालक तेथून निसटला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चारचाकीच्या मालकाचा क्रमांकावरून शोध घेत चालकावर कारवाई केली.